खारअंबोली धरणावर पर्यटकांची रेलचेल

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।

मुरुड तालुक्यात संततधार पावसामुळे तालुक्यातील धरणे-धबधबे तुडूंब भरून वाहु लागले आहेत. त्यामधील पर्यटकांना आकर्षित करणारा अंबोली धरण व सवतकडा धबधबा पुर्णतः भरून वाहू लागल्याने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. परंतु, लोणावळ्याला झालेल्या अपघातामुळे शासनाने बंदी घातली असल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहेत.

मुरुड पासून काही अंतरावर असलेला सवतकडा धबधबा व अंबोली धरणात डोंगर, कपारी, कातळावर साठलेले पावसाचे पाणी एकत्र येऊन पुढे मोठा प्रवाह निर्माण होतो. या प्रवाहात पोहण्यासाठी व आनंद घेण्यासाठी स्थानिक व पर्यटक येत असतात. धबधब्याच्या वरच्या बाजूला अत्यंत संथ वाहणारे पाणी जेव्हा मोठ्या खडकावरुन खाली कोसळतो तेव्हा ते चित्र मनाच्या आतील कप्प्यात कायमस्वरूपी बंद करून ठेवण्या इतपत सुंदर आणि नेत्रदीपक असते. त्याबरोबर धरणाच्या आजुबाजुला गर्द वनराईत पसरलेल्या हिरव्या वेली, रंगबेरंगी फुले, त्यावर बागडणारी फुलपाखरे, पक्षाचा किलबिलाट आणि अंगाला झोंबणारा गार वारा या सर्व निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी हजेरी लावत असतात.

परंतु, येथे येण्यास शासनाने बंदी घातल्यामुळे येणार पर्यटक वर्ग नाराज आहे. ईश्‍वराने या निसर्गाची रचना अत्यंत चांगल्या प्रकारे केली असून यावर बंदी हा उपाय नसून नियोजन करणायची गरज असल्याचे पर्यटक व स्थानिकांकडून बोलले जात आहे.

Exit mobile version