। पनवेल । वार्ताहर ।
पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या कर्नाळा पक्षी अभय अरण्याला दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. पावसाळ्यात या पर्यटकांच्या संख्येत आणखीनच भर पडत असते. यंदा देखील कर्नाळा पक्षी अभय अरण्याला भेट देणार्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असून रविवारी (दि.23) जवळपास 1 हजार 577 पर्यटकांनी कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देऊन निसर्गाच्या सानिध्याचा आनंद घेतला आहे.
पनवेलपासून 12 किलोमीटर अंतरावर कर्नाळा किल्ला आहे. विविध प्रकारचे वृक्ष, वेलींचा गराडा असलेल्या या किल्ल्याच्या परिसरात विविध प्रजातीचे सव्वाशे ते दीडशे पक्षी आढळत असल्याने सुमारे 12 चौरस किमी परिसरात पसरलेल्या या प्रदेशाला पक्षी अभय आरण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कर्नाळा किल्याला ऐतिहासिक महत्व देखील आहे. कर्नाळा किल्यावर अनेक ऐतिहासिक स्थळे असून, पशु-पक्षी निरीक्षकांसोबत इतिहासाचा अभ्यास करणार्यांना देखील कर्नाळा पक्षी अभय अरण्याने भुरळ घातली असल्याने कर्नाळा पक्षी अभय अरण्याला भेट देणार्या पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. पावसाळ्यात पक्षी अभयारण्य परिसरात अनेक लहान मोठे ओढे आणि धबधबे वाहत असतात. यामुळे अभयारण्याच्या सौंदर्यात भर पडत असते. सध्या सुरु असलेल्या पावसाळ्यामुळे अनेकजण पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत असून, सुट्ट्यांमुळे पावसाळी पर्यटनाचे आराखडे आखलेल्या अनेकांनी कर्नाळा पक्षी अभयारण्याला भेट देण्यास पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी हजारो पर्यटकांनी कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटनाचा आनंद घेतला आहे. ज्यामध्ये 109 लहान मुलांचा समावेश आहे.