। माथेरान । वार्ताहर ।
पावसाळ्यात निसर्गाच्या सानिध्यात रिमझिम जलधारा अंगावर झेलण्यासाठी आणि इथल्या निसर्गरम्य वातावरणात निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी पर्यटकांनी दुसर्या शनिवारी असलेल्या सुट्टीच्या दिवशी माथेरानला पसंती दिली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे एकप्रकारे पर्यटकांची मांदियाळी असल्याचे पहायला मिळाले.
काही ठिकाणी धबधब्यावर अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्याठिकाणी पर्यटकांना पर्यटनासाठी मज्जाव केल्याने सर्वांनी जवळचे पर्यटनस्थळ म्हणून माथेरानला पसंती देत मोठया प्रमाणावर गर्दी केलेली दिसत आहे. सकाळपासून गावात रूम्स शोधण्यासाठी सर्वांची लगबग सुरु होती. अनेकांना रूम्स अभावी निराश होऊन माघारी जावे लागल्याने इथल्या निसर्गाशी हितगुज साधता आली नाही.
जेमतेम आठ ते दहा हजार पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाल्यास हे ठिकाण हाऊसफुल्ल होऊन जाते. घाटातुन वर येणार्या खाजगी वाहनांना सुलभपणे जागा उपलब्ध करून देण्यासाठी पार्किंग मध्ये वनखात्याने आपल्या परीने प्रयत्न केले तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सुध्दा चोख बंदोबस्त ठेऊन होते. दस्तुरीपासून गावात येण्यासाठी कुणी ई रिक्षाच्या साहाय्याने तर हौशी पर्यटक घोड्यावर बसून येत होते. पॉईंट्सवरील नयनरम्य देखावे न्याहाळण्यासाठी अनेकजण पायी चालत जाण्याची मजा घेत होते. मुख्य पॉईंट असणार्या इको पॉईंट तसेच शारलोट लेक या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी दिसत होती. छोट्या-छोट्या स्टॉलधारकांना उत्तम प्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. उन्हाळ्यात जेवढा व्यवसाय मिळत नाही. त्यापेक्षाही पावसाळ्यात चांगल्या प्रकारे उत्पन्नाचे साधन पर्यटकांच्या माध्यमातून मिळत असल्याचे स्टोल्स धारक बोलत आहेत. एकंदरीत सर्वांना पावसाळ्यात शनिवार आणि रविवार यादिवशी उत्पन्न लाभत आहे. ट्रेन सोबत फोटो काढण्यात अनेक पर्यटक मशगुल असल्याचे दिसून आले.
खरोखरच माथेरानमध्ये पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरण आणि हवेतील गारवा मनाला ताजेतवाने करत असतो. दाट धुक्यामुळे आपण एका वेगळ्याच दुनियेत असल्याचा भास झाला. एक ते दोन दिवस मुक्कामासाठी हे ठिकाण उत्तम आहे. आम्ही खूपच एन्जॉय केला.
ऐश्वर्य बांदल
पर्यटक
मुंबई