माथेरानमध्ये पर्यटकांची तोबा गर्दी

शेवटचा विकेंड हाऊसफुल्ल
| संतोष खाडे | माथेरान |
माथेरानमध्ये उन्हाळी पर्यटन हंगामाच्या अनुषंगाने लॉकडाऊननंतर प्रथमच पर्यटकांची तोबा गर्दी पहावयास मिळाली. बोहरा समाजाचे धर्मगुरू येथे दाखल झाल्याने त्यांचे बाराशे अनुयायीसुद्धा माथेरानमध्ये आल्याने तसेच अश्‍वशर्यती आयोजित केल्याने आदिवासी बांधवांसाहित मुंबई येथील घोडेस्वार दाखल झाल्याने माथेरानला जत्रेचे स्वरूप आले असून, मे महिन्याच्या शेवटच्या विकेंडला माथेरान हाऊसफुल्ल झाले आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने गेली दोन वर्षे पर्यटक फिरकले नाहीत. माथेरान सुरू झाल्यानंतर पर्यटक थोड्या फार प्रमाणात येत होते. एप्रिल आणि मे महिना येथील मुख्य उन्हाळी पर्यटन हंगाम असतो. मात्र, या पर्यटन हंगामातसुद्धा पर्यटक संख्या कमी होती. अनेक व्यापारी चिंतेत असताना शनिवार 28 मे आणि रविवार 29 मे रोजी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. शनिवारी एक दिवसात सात हजार सहाशे पासष्ठ पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले आहेत. तर, रविवारी सहा हजारांपेक्षा जास्त पर्यटक आले आहेत. दोन दिवसांत 13 हजारांपेक्षा जास्त पर्यटक आल्याने माथेरानमधील हॉटेल्स, लॉज पूर्ण क्षमतेने भरले असून, व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गाडी पार्क करण्यासाठी पर्यटक ताटकळत
सकाळपासून आपली खासगी वाहने घेऊन लोकांनी माथेरानमध्ये येण्यास सुरुवात केली. वन व्यवस्थापन समितीची एकमेव असणार्‍या पार्किंगमध्ये गाड्या वाढत जाऊ लागल्या. सकाळी 11 नंतर येणार्‍या पर्यटकांच्या गाड्या घाटात उभ्या होत्या. पार्किंगसाठी एकामागोमाग एक गाड्या उभ्या होत्या. गाडी पार्किंग करण्यासाठी पर्यटकांना तासन्तास घाटात ताटकळत राहावे लागले.

लॉकडाऊननंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले आहेत. येथे आलेल्या सर्व पर्यटकांना सगळ्या सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये आलेले पर्यटक येथील निसर्गाचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत.नगरपालिकेकडून पर्यटनाच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना केल्या आहेत. सुरेखा भणगे-शिंदे, मुख्याधिकारी

माथेरान हे मुंबईपासून जवळ असल्याने आणि अश्‍वशर्यती असल्याने आम्ही माथेरानमध्ये आलो. इतर पर्यटनस्थळांपेक्षा माथेरान हे पर्यटनस्थळ मनमोहक आहे. तुळशीराम चव्हाण, पर्यटक, ठाणे

एप्रिल महिन्यापासून माथेरान पर्यटन हंगाम सुरू होतो. पण, यावेळी पर्यटक कमी येत होते, त्यावेळेस थोडे चिंतेचे वातावरण होते. पण, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले. खरेदीसुद्धा चांगली सुरू आहे. त्यामुळे काही प्रमाणात चिंता दूर झाली आहे. नितेश कदम, स्थानिक व्यावसायिक

मिनिट्रेन हाऊसफुल्ल
शनिवारी आणि रविवार मिनिट्रेनच्या सर्व फेर्‍या हाऊसफुल् गेल्या. महाग समजला जाणारा प्रथम श्रेणी फर्स्ट क्लास डब्बा यालासुद्धा पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. द्वितीय श्रेणीच्या तीन बोग्या आणि फर्स्ट क्लास एक अशा चारही बोगी फुल जात होत्या. येऊन-जाऊन एकूण 20 फेर्‍या एकदम फुल जात होत्या. मात्र काही पर्यटकांचा तिकीट न मिळाल्याने हिरमोड झाला.

Exit mobile version