सर्व्हर डाऊन, उकाडा आणि गैरसोयींमुळे नागरिक हैराण
। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।
पनवेल एसटी डेपोच्या बुकिंग कार्यालयात स्मार्ट कार्ड काढण्यासाठी शनिवारी (दि.11) सकाळी आठ वाजल्यापासून महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली. घरातील कामे बाजूला ठेवून अनेक महिला सकाळीच रांगेत उभ्या राहिल्या; मात्र तासन्तास प्रतीक्षा करूनही अनेकांची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत.
स्मार्ट कार्ड नोंदणीचे काम एका खाजगी कंपनीकडे देण्यात आले असून, दिवसभर वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू होती. त्यामुळे रांगेतील नागरिकांचा संयम सुटल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर दिवसभर पावसामुळे दमट वातावरण निर्माण झाले होते. बुकिंग कार्यालयात पुरेशा हवेशीर व्यवस्थेचा अभाव असल्याने उकाड्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह आलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांना उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा उपलब्ध नव्हती.
रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांनी प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत, सर्व्हरची समस्या तातडीने सोडवावी तसेच बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि पंख्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी केली.
स्मार्ट कार्डसारख्या महत्त्वाच्या सेवेसाठी नागरिकांना तासन्तास हेलपाटे मारावे लागत असल्याने एसटी प्रशासनाने आणि संबंधित खाजगी कंपनीने कार्यपद्धतीत तातडीने सुधारणा करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
