गोड्या पाण्याच्या माशांसाठी खवय्यांची नेरळच्या नाक्यावर गर्दी

। नेरळ। संतोष पेरणे ।
पावसाळयाच्या सुरु होताच नेरळमधील बाजारपेठ गोड्या पाण्यातील माशांनी भरते. येथील अंबिका नाक्यावरील माशांच्या संध्याकाळी भरणार्‍या बाजारात गोड्या पाण्यातील मासे खरेदी करण्यासाठी झुंबड उडत असते. दरम्यान, अनेक प्रकारचे चवदार मासे नेरळच्या बाजार पेठेत दाखल झाले असून हे मासे खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे.


नेरळमधील अंबिकाभुवन नाका आणि नेरळ रेल्वे स्टेशनच्या बाहेर मासे विक्रेते मासे विक्रीसाठी बसलेले असतात. उल्हासनदीच्या पाण्यातून आणि परिसरात असलेल्या धरणामधून मासे पकडून आणले जातात. ते सर्व मासे गोड्या पाण्यातील असल्याने ते मासे खरेदीसाठी खवय्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. हे सर्व ताजे मासे नेरळ परिसरातील कातकरी आणि मल्हार कोळी लोक सकाळी जाळी लावून मासे पकडतात आणि दुपारी ते विक्रीसाठी नेरळ बाजारपेठेत आणतात. कुंभे येथील कातकरी समाजाच्या लोकांचा हा व्यवसाय नेरळ बाजारपेठेत वर्षभर सुरू असतो.


पावसाळ्यात जाळ्यात अडकणारे मासे हे चवदार असतात,त्यामुळे त्यांची खरेदी करण्यासाठी कल्याण पासून पनवेल पर्यन्तचे ग्राहक येत असतात. पावसाळा सुरू झाली की माशांच्या पोटामध्ये असलेली अंडी भरलेले मासे खाण्याकडे अधिक कल खवय्यांच्या असतो. हे मासे काही ठराविक काळ सापडत असल्याने त्यांना पकडून आणण्यासाठी कातकरी समाजाचे लोक दिवस रात्र एक करीत असतात. त्यामुळे हे वल्गनीचे मासे पकडून आणण्यासाठी आणि त्यानंतर विक्री साठी आणण्याकरिता धडपड असते. ठराविक काळात मिळणारे ते सर्व मासे जास्त चवदार लागत असल्याचे काही मासे खरेदीसाठी आलेले ग्राहक हे मासे खरेदीसाठी मोठी गर्दी करतात.

नेरळ बाजार सध्या पावसाळ्यात प्रसिध्द असलेले खेकडे (मुठे), काळी चिंबोरी, काळ्या रंगाचे मळ्याचे मासे, चिवना मासे, करावले, मुरी, डाकूमासा, वाम, शिवडे अशा अनेक प्रकारचे मासे विक्रीसाठी ठेवल्याचे दिसत आहेत. दुपार पासून हे सर्व आदिवासी लोक नदीमधील मासे नेरळच्या हुतात्मा हिराजी पाटील चौकातील अंबिका हॉटेलच्या बाजूला टोपलीमध्ये आणलेले मासे विक्रीसाठी घेऊन येतात. कल्याण पासून पनवेल पर्यंत च्या भागातील गोड्या पाण्यातील माशांची आवड असलेले मासे खरेदी करण्यासाठी मासे खरेदी करीत असल्याचे दिसून येते. एकतर हे मासे बाजारात या हंगामात उपलब्ध होतात. माश्यांचा सोबतीला खेकडीदेखील बाजारात विक्रीसाठी आल्याने मांसाहारी मंडळी भलतीच खुश आहेत. मासे विक्री व्यवसाय यावरच अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो.त्यामुळे मासे खरेदी करणारी मंडळी जास्त जास्त कटकट न करता सांगतील तो भाव देऊन मासे खरेदी करतात. त्यामुळे हे मासे खरेदी साठी मोठी झुंबड पाहायला मिळत आहे.

आमच्या हॉटेलच्या बाजूला तब्बल 50 वर्षांपासून मासे विक्री करण्यासाठी आदिवासी लोक येत असतात. आम्ही त्या सर्वांना तेथे बसण्यासाठी कधीही आडकाठी करीत नाही आणि तशी शिकवण आमच्या वडिलांची आहे. त्यामुळे त्या आदिवासी लोकांबरोबर माझे घराच्यांसारखे संबंध निर्माण झाले आहेत.

– प्रकाश नायक – अंबिका हॉटेलचे मालक

अंबिका हॉटेलच्या बाजूला मासे घेऊन येणारे आदिवासी यांच्याकडील मासे उल्हास नदीमधील गोड्या पाण्यातील मासे असतात. गोड्या पाण्यातील माशांची चव हि वेगळी असते आणि त्यामुळे आम्ही सिझननुसार मासे खरेदी करायला आवर्जून येत असतो.

– दिलीप कराळे – ग्राहक
Exit mobile version