कुत्र्याच्या पिल्लाला क्रूर वागणूक

सुरक्षारक्षकांविरुध्द गुन्हा
| पनवेल । वार्ताहर ।
नऊ महिन्यांच्या कुत्र्याच्या पिल्लाला क्रूर वागणूक देत त्याला मारुन निर्जन ठिकाणी टाकल्याचा सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची व्हाईस ऑफ सिटीझन या प्राणी प्रेमी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच सदर कुत्र्याच्या पिल्लाला क्रूर वागणुक देणार्‍या पनवेलमधील अमेटी विद्यापीठातील सुरक्षारक्षकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सदर प्रकरणातील तक्रारदार मिथीला नाडकर्णी (43) या व्हाईस ऑफ सिटीझन या संस्थेच्या सदस्या असून त्या कामोठे भागात राहण्यास आहेत. त्यांची संस्था प्राणी प्रेमी असून प्राण्यांना क्रूर वागणुक देणार्‍या व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करते. 9 मार्च रोजी या संस्थेच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर एका नऊ महिन्यांच्या कुत्र्याच्या पिल्लाला मारुन त्याला एका गोणीतून अज्ञात ठिकाणी टाकून दिल्याचा व्हिडीओ एका सदस्याने टाकला होता.

त्यामुळे या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सदर व्हिडीओबाबत अधिक माहिती घेतली असता, सदरचा व्हिडीओ पनवेल मधील अमेटी विद्यापीठातील सुरक्षारक्षकांचा असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यानंतर व्हाईस ऑफ सिटीझन या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सदर प्रकाराची गंभीर दखल घेऊन तत्काळ पनवेल तालुका पोलीस ठाण्यात कुत्र्याला क्रूर वागणूक देऊन मारुन टाकणार्‍या सुरक्षारक्षकांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुरक्षारक्षक अजय गुप्ता, लक्ष्मण चौगुले आणि इतर सुरक्षारक्षकांविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

Exit mobile version