क्रिप्टोतील गुंतवणुकीच्या अमिषाने फसवणूक

| पनवेल । वार्ताहर।
क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे इन्स्टाग्रामवरून सायबर चोरट्याने दाखवलेल्या प्रलोभनाला बळी पडलेल्या एका 14 वर्षीय मुलाने आपल्या वडिलांच्या बँक खात्यातून 1 लाख 11 हजार रुपये सायबर चोरट्याला पाठवून दिल्याचा प्रकार कामोठे येथे उघडकीस आला आहे. वडिलांच्या खात्यातील सर्व रक्कम गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कामोठे पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरट्यांविरोधात आयटी क्टनुसार गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील 14 वर्षीय मुलगा कामोठे सेक्टर-6 मध्ये आपल्या आई-वडिलासंह राहण्यास असून सध्या तो शिक्षण घेत आहे.

गत 8 मार्च रोजी या मुलाच्या इन्स्टाग्राम खात्यावर वरून कुमार नावाच्या व्यक्तीने क्रिप्टो वरून या इन्स्टाग्राम खात्यावरून क्रिफ्टोची माहिती पाठवून दिली होती. तसेच क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त पैसे मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले होते. याला हा मुलगा बळी पडल्याने त्याने सायबर चोरट्याच्या सांगण्यानुसार गत 8 ते 15 मार्च या कालावधीत क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्या वडिलांना न सांगता त्यांच्या बँक खात्यातून थोडी थोडी करत एकूण 1 लाख 11 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने सायबर चोरट्याला पाठवून दिले. या मुलाचे वडील एलआयसीचा हप्ता भरण्यासाठी गेले असता त्यांच्या बँक खात्यात पैसे नसल्याचे त्यांना समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी कामोठे पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली.

Exit mobile version