महापारेषणला सीएसआर इंडिया पुरस्कार जाहीर

महाबलीपूरम येथे पुरस्कारचे वितरण
। मुंबई । वृत्तसंस्था ।
नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा सीएसआर इंडिया पुरस्कार महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला (महापारेषण) जाहीर झाला आहे. या पुरस्कारचे हे आठवे वर्ष असून, कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल कोरोना योध्दा या गटात हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तमिळनाडूमधील महाबलीपूरम येथे 25 नोव्हेंबर रोजी या पुरस्कारचे वितरण करण्यात येणार आहे.
महापारेषण कंपनीने राज्य आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला दोन कोटींचा निधी दिला. तसेच विदर्भातील कोव्हिड-19 च्या रूग्णांना आरोग्य सुविधा व उपचार मिळण्यासाठी विदर्भ रिलीफ कमिटी, विभागीय आयुक्त नागपूर/अमरावती व नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून 200 लसीकरण व्हॅन उपलब्ध करण्यात आल्या. यासाठी पंचवीस कोटींचा खर्च आला.
या 200 लसीकरणाच्या व्हॅन विदर्भातील दुर्गम भागातील खेड्यापाड्यात लसीकरणाची सुविधा पोहोचविण्यासाठी तसेच समाजातील दुर्बल घटक, गर्भवती महिला, दिव्यांग, वृध्द व्यक्ती तसेच इतर आजाराने ग्रासलेले जे लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्यांना लसीकरणाची सुविधा पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. तसेच नागपूर शहरातील कोविड-19 च्या गरीब व गरजू रूग्णांना दोन कोटींच्या आरोग्य सुविधा व उपचार करण्यात आले.

ऊर्जा क्षेत्रात महापारेषण कंपनी मोठी भूमिका बजावत आहे. कोव्हिड-19 च्या महामारीमध्येही कंपनीने सामाजिक दृष्टिकोन ठेवून समाजातील गरीब व गरजू रूग्णांना आरोग्य सुविधा व उपचार देण्याचे काम केले आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम महापारेषण सीएसआरच्या माध्यमातून करीत आहे.
-दिनेश वाघमारे (भा.प्र.से.)
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महापारेषण

Exit mobile version