गरिब रूग्णांना आर्थिक भुर्दंड
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. आज या विभागास भेट दिली त्यावेळी सांगण्यात आले की, मशीन शुक्रवार पासून बंद आहे. मशीनच्या देखभालीबाबत ज्या कंपनीसोबत करार आहे त्यांचे तंत्रज्ञ येवून मशीन लवकरात लवकर चालू करण्याचे प्रयत्न सरू आहेत.
अलिबाग सीव्हील हॉस्पीटलमधील सिटी स्कॅन मशीन अचानक बंद झाल्याने रुग्णांचे हाल प्रचंड हाल होत आहेत. तांत्रिक कारणामुळे मशीन बंद झाल्यास अलिबाग मधील लोटस् सिटी स्कॅन केंद्रासोबत सामंजस्य करार करण्यांत आला होता. परंतु लोटस सिटी स्कॅनही बंद असल्याने रूग्णांना वडखळ किंवा नवी मुंबई येथे जावे लागत आहे. गरिब रूग्णांना खाजगी रूग्णवाहिका करून जाणे अतिशय खर्चीक पडत आहे. अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज किमान दोनशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांना चांगली सेवा मिळावी, तसेच अपघातग्रस्त व अन्य रुग्णांना तातडीने सिटी स्कॅनमार्फत आजाराचे निदान व्हावे, यासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन उपलब्ध करण्यात आली होती. मात्र तांत्रिक बिघाडामुळे मशीन वारंवार बंद पडत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
रुग्णांना सिटी स्कॅनसाठी खासगी रुग्णालयात जावे लागल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तांत्रिक कारणामुळे मशीन बंद झाल्यास अलिबागमधील खाजगी केंद्रासोबत सामंजस्य करार करून गरिब रुग्णांना सिटी स्कॅन चाचणी मोफत पुरविण्याबाबत रुग्ण कल्याण समितीमधून तात्काळ मंजुरी दयावी, अशी मागणी केली जात आहे.