15 सप्टेंबरपर्यंत शाळांमध्ये पाककृती स्पर्धा
। रायगड । प्रतिनिधी |
यंदापासून राज्यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिवाय देश पातळीवर सप्टेंबर महिना पोषण माह म्हणूनही साजरा होतो. याचे औचित्यसाधून यंदापासून शाळांमध्ये शाळा व तालुकास्तरावर पाककृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 1 ते 15 सप्टेंबर दरम्यान ही पाक स्पर्धा पार पडणार असून यात उत्कृष्ट पाककृतींना बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली.
खासगी अनुदानित शाळांसह जिल्हा परिषदेच्या शाळेत दररोज विद्यार्थ्यांना दुपारी पोषण आहार दिला जातो. जिल्ह्यात तीन हजार ५५ शाळांतील एक लाख ९१ हजार २०६ विद्यार्थी रोज खिचडी खातात. परंतु अनेक ठिकाणी ही खिचडी बेचव असल्याच्या तक्रारी आहेत. त्यात पौष्टिक तृणधान्य समाविष्ट करून खिचडी अधिक रूचकर व्हावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. याशिवाय बहुतांश शाळांमधून मोठ्या प्रमाणात शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्या सहकार्याने परसबाग विकसित केलेल्या आहेत. या परसबागेतील उत्पादित भाजीपाल्याचा समावेश नियमितपणे आहारामध्ये देखील करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने देखील आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने तृणधान्य विषयक जनजागृती करण्याचे निर्देश दिलेले आहेत. बदलत्या जीवनशैलीत जंकफूड खाण्याच्या सवयीमुळे आहारातून पौष्टिक तृणधान्यांचा वापर कमी होत चालला आहे. मुलांचा आहार कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वांनी समृद्ध असणे आवश्यक आहे. ही गरज तृणधान्यामधून भागविणे शक्य आहे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्ययुक्त आहाराची सवय लावणे आवश्यक आहे.
याकरिता तृणधान्यापासूननिर्मित विविध पाककृतींचा समावेश दैनंदिन आहारामध्ये केल्यास मुलांना वेगळेपणा मिळेल व हा आहार विद्यार्थी आवडीने खाऊ शकतील, याच हेतूने ही पाककृती स्पर्धा आयोजित केली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शाळा स्तरावरील स्पर्धा आयोजित केली जाईल. त्यात शालेय पोषण आहार शिजवणारे स्वयंपाकी, मदतनीस किंवा पालकही सहभागी होऊ शकतात. त्यातून उत्कृष्ट पाककृतींची निवड तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी होईल. तालुका स्तरावरील स्पर्धा दुसर्या आठवड्यामध्ये घेण्यात येईल.
असे आहे बक्षीसाचे स्वरूप : तालुका पातळीवर प्रथम – 5 हजार, द्वितीय – साडेतीन हजार आणि तृतीय – अडीच हजार