एक एकर जमिनीवर काकडीची लागवड
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत पेटारवाडीमधील आदिवासी शेतकर्याने तब्बल 500 मीटर अंतरावरून पाणी आणून भाजीपाला शेती केली आहे. पोश्री नदीतील पाणी आणून त्यावर काकडी आणि काही भाज्यांची लागवड केली.
पेटारवाडी येथील वसंत कान्हू वारघडे हे शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहसाठी आपल्या शेतीवर भाजीपाला शेती करतात. त्यांच्या शेतापासून पोश्री नदी हि साधारण 500 मीटर अंतरावर आहे. मात्र, नदीपासून शेताचा भाग हा तीव्र चढवला असल्याने पाणी शेतात आणण्यासाठी अधिक इंधन खर्च करावे लागते. डिझेल पंपासाठी दिवसाआड 800 रु खर्च येतो. काही विघ्नसंतोषी लोकांकडून पाईपलाईन तोडण्यात आल्यावर वेगळा खर्च सहन करावा लागत आहे. तरीदेखील वसंत आणि आशा वारघडे या कुटुंबाकडून भाजीपाला शेती केली जाते. तेथील एक एकर जमिनीवर वारघडे यांनी काकडीची शेती केली आहे. त्याचवेळी चवळी, झेंडूची फुले यांची शेती केली असून काकडीचे नाझिया जातीचे बियाणे वापरले आहे. या बियाणांपासून अवघ्या 41 दिवसात काकडीचे पीक शेतीतून मिळू लागले आहे.