| चौल | राकेश लोहार | अलिबाग ताालुक्यातील कामार्ले येथील रहिवासी सुधीर गोविंद नागावकर गेली दहा वर्षांहून अधिक काळ एक एकरात ‘पेरभात’ पद्धतीने भातपिकाची लागवड करीत आहेत. यंदाही त्यांच्या शेतात कर्जत-2 या बियाण्याची पेरणी केली असून, 20 दिवसांची रोपे चांगली टरारून शेती हिरवीगार झाली आहे. यंत्राच्या किमती महागड्या असल्याने सामान्य शेतकऱ्याला यंत्राच्या सहाय्याने भातलावणी करणे परवडण्यासारखे नाही. अशातच पेरभात पद्धतीमुळे भाताचे पीक घेतल्याने नागावकर यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. तसेच चिखळणी, लावणी आणि मजुरीच्या खर्चात मोठी बचत झाली आहे.
सुधीर नागावकर यांची सुमारे एक एकर शेतजमीन आहे. शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे. शेतीत अनेकानेक प्रयोग करुन त्यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून अल्पावधीतच नावलौकिक कमावलेले आहे. आज अनेक शेतकरी आधुनिक यंत्राच्या माध्यमातून शेती करण्यास पसंती देत असताना, सुधीर नागावकर यांनी पारंपरिक शेतीतूनही चांगले उत्पादन घेता येते, हे शेतकऱ्यांना दाखवून दिले आहे. त्यांच्या आदर्शवत शेतीची भुरळ तरुण शेतकऱ्यांनाही पडली आहे. नागावकर हे पूर्णवेळ शेती करत आहेत. अन्य शेतकऱ्यांनीसुद्धा या पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सुधीर नागावकर यांना आधीपासूनच शेतीची आवड आहे. त्यामुळे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग ते नेहमीच करीत असतात. मागील दहा वर्षांपासून ते शेतीमध्ये पेरभात या पद्धतीचा वापर करुन शेती करीत आहेत. आज शेतीलागवडीसाठी आधुनिकतेचा वापर होत असताना, पारंपरिक पद्धतीने ही शेती केली, तरी चांगले उत्पादन घेता येते, हे सुधीर नागावकर यांनी दाखवून दिले आहे.
खर्च, वेळ, श्रम वाचले पूर्वांपार प्रचलित भातशेतीत रोप तयार करण्यासाठी चिखलणी करावी लागते. सुमारे 21 दिवसांनंतर रोपवाटिकेतील रोपांची पुनर्लागवड करताना पुन्हा चिखलणीचे काम करावे लागते. पेरभात पद्धतीत थेट भातबियाण्यांचे रोवणी केल्याने चिखलणी, रोपे उपटणे व पुनर्लागवड अशी तिन्ही कामे वाचली. त्यातील खर्चातही बचत झाली आहे. पेरभात पद्धतीत दोन रांगांमध्ये दीड ते दोन फुटांचे अंतर ठेवले असून, नांगरी करीत रोवणी केली जाते.
मजूरबळात बचत पारंपरिक शेतीत एकरी 20 ते 25 जणांचे मजूरबळ व तेवढीच मजुरीचे पैसे लागले असते. हा खर्च कापणीपर्यंत दहा ते पंधरा हजार रुपयापर्यंत पोहोचला असता. त्या तुलनेत पेरभात तंत्राद्वारे खर्चात पूर्णतः कपात झाली आहे. या पद्धतीत भात रोवणीसाठी एक मजूर, एका नांगराची गरज भासली. यामुळे एकसंघ रोवणीचा उद्देश साधता आला आहे.
पेरभात म्हणजे काय? पाऊस पडताच साधारण जमीन ओली झाल्यानंतर नांगराच्या सहाय्याने शेतजमीन फोडून घेतली. त्यानंतर नांगराच्या माध्यमातून सरळ रांगा उखळण्यात आल्या. त्यात एका मजुराच्या सहाय्याने रांगेत भात बियाणे टाकून ते जमिनीत दडकण्यात येते. दोन रांगांमध्ये दीड ते दोन फूट अंतर ठेवण्यात येते. दोन रांगांमध्ये अंतर ठेवल्याने हवा खेळती राहते. त्याचा पुढे उत्पादनावर परिणाम होतो, असे नागावकर यांनी सांगितले. लावणी पद्धतीत रासायनिक खतांचे तीन डोसेस द्यावे लागतात, तिथे या पद्धतीत एक डोस व त्यावरील खर्च वाचल्याचे ते म्हणाले.
फुटव्यांचे प्रमाण अधिक पारंपरिक भातलागवड पद्धतीत रोपाला 10 ते 15 फुटवे येतात. पेरभात पद्धतीत 30 हून अधिक फुटवे येतात. पारंपरिक पद्धतीत पुनर्लागवड करताना रोपे एक ठिकाणाहून दुसरीकडे लावताना मुळांना इजा होण्याचा धोका असतो. पेरभात पद्धतीत मात्र, थेट बियाणे लावले जात असल्याने असा धोका संभवत नाही. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत साधारणतः आठ दिवस आधीच पीक कापणीस येते.
हवामान बदलावरही मात यंदा मे महिन्यापासूनच अवकाळी पावसाने झोडपून काढले, त्यानंतर मान्सूनचे आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरण्या करणे शक्यच झाले नाही. अनेकांनी रो करुन पेरणी केली, परंतु जमिनीची ऊब गेल्याने ती तोट्याची ठरली. त्यामुळे यंदा लागवडीसाठी भाताची रोपे मिळणे शक्य नसल्याने अनेक जमिनी ओसाड राहण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना, सुधीर नागावकर यांची पेरभात शेती उजवी ठरली आहे.
पारंपरिक पद्धतीत : एकरी 12 क्विंटल भाताचे उत्पादन पेरभात पद्धतीत : 18 ते 20 क्विंटल भाताचे उत्पादन
आधुनिक पद्धतीने शेती करण्यास विरोध मुळीच नाही. परंतु, पारंपरिक पद्धतीने काळ आणि वेळ, आणि हवामानाचा अंदाज घेऊन शेती केल्यास ती फायद्याचीच आहे. या पद्धतीने गेली दहा वर्षे शेती करीत असून, ती फायद्याचीच ठरली आहे.