आषाढी एकादशीच्या तोंडावर आळंदीत संचारबंदी

स्थानिक दुकानदारांवर संक्रात
। पंढरपूर । प्रतिनिधी ।
कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आषाढीवारीच्या तोंडावर आळंदी व परिसरातील गावांमध्ये संचारबंदीचे आदेश लागु केल्याने आळंदीतील हार फुले,प्रसाद,अशा छोट्या मोठ्या व्यवसायांवर मोठं संकट उभे राहिले आहे.गेल्यावर्षीपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे आषाढी, कार्तिकी असे दोन्ही सोहळ्यादरम्यान आळंदीत संचारबंदी लागु केल्याने अलंकापुरीत येणारा वारकरी,भाविक येणार नाहीत. त्यामुळे आळंदीतील व्यवसाय संकटात सापडले आहेत. यंदाचा आषाढी वारी सोहळ्यात तरी कुठतरी निर्बंधांवर शिथीलता येऊन व्यवसायांना हातभार लागेल, अशी आशा असताना वारीच्या तोंडावर पोलीस प्रशासनाकडुन पुन्हा संचारबंदी लागु करण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या आळंदीत आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशाभरातुन लाखोंच्या संख्येने वारकरी देवाच्या नगरीत दाखल होतात. याचदरम्यान माऊलींच्या आठवणीत वारकरी खरेदी करत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर माऊलींचे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याने दोन वर्षापासुन व्यवसायांवर संक्रातच आल्याची भावना व्यवसायिक व्यक्त करत आहेत.
गेल्यावर्षीचा आषाढी-कार्तिकी वारी सोहळा मर्यादित वारकर्‍यांच्या उपस्थित संपन्न झाला. त्याच धर्तीवर यंदाचा आषाढीवारी सोहळा साजरा होत असल्याने आळंदीतील सर्व छोट्या मोठ्या व्यवसायांवर मोठं आर्थिक संकट उभं राहिले आहे. त्यामुळे इतरांना जसा राज्य सरकारने मदतीचा हात दिला त्याच धर्तीवर आळंदीतील व्यवसायिकांना मदतीचा हातभार द्यावा अशी मागणी स्थानिक दुकानदारांकडून होत आहे.डोळे भरुनी पहावा अशा माऊलींच्या आषाढी सोहळा कोरोना महामारीची यंदाही नजर लागल्याने माऊलींच्या दारी संचारबंदी लागू करण्यात आल्याने वारकरी, भाविकांची भेट लांबणीवर गेली. तर दुसरीकडे माऊलीच्या दरबारातील व्यवसायही बंद होणार असल्याने जगायचं तरी कसं, असंच म्हणण्याची वेळ आता आळंदीकरांवर आली आहे.

Exit mobile version