‘या’ नऊ गावांत संचारबंदी

। पंढरपूर । प्रतिनिधी ।
आषाढी वारीकाळात पंढरपूर आणि परिसरातील नऊ गावांत नऊ दिवस संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी दिली. यात्राकाळात प्रथा, तसेच मंदिरातील विविध धार्मिक विधी, परंपरा जपण्याच्या दृष्टीने शासनाने परवानगी दिली आहे. आषाढी एकादशी यंदा 20 जुलैला आहे, तर 11 तारखेपासून 28 जुलैपर्यंत पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. मानाच्या 10 पालख्या प्रत्येकी 40 वारकऱयांसह 19 जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत वाखरी येथे एसटी बसने येतील. त्यानंतर तीन किलोमीटरचा वाखरी ते विसावा मंदिर इसबावी हा प्रवास चालत प्रत्येक पालखीसोबत दोन मानकरी करतील, तर बाकीचे वारकरी एसटीने येतील.

19 रोजी पालख्या पंढरपुरात आल्यानंतर परतीचा प्रवास 24 जुलै रोजी सुरू होणार आहे. शासकीय महापूजा 20 रोजी पहाटे 2.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आषाढी वारीत गर्दी होऊ नये, यासाठी शनिवार, 17 जुलै दुपारी 2 वाजेपासून रविवार, 25 जुलै दुपारी 4 वाजेपर्यंत पंढरपूर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. भाटंबुरे, चिंचोळी-भोसे, शेगावदुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाणी या नऊ गावांतही संचारबंदी लागू राहील. या काळात पंढरपुरातील एसटी, तसेच खासगी प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे. 18 ते 25 जुलै या काळात वारकऱयांना चंद्रभागेत स्नान करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

Exit mobile version