ग्राहकांची हॉटेल मालकास मारहाण

| पोलादपूर | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 लगत पारले गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या हॉटेलमध्ये गर्दीच्या वेळी हॉटेल मालकास मारहाण झाल्याची घटना मंगळवारी (दि.2) रात्रीच्या सुमारास घडली. तीन आरोपींविरुद्ध पोलादपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 लगतच्या पार्ले गावामध्ये मनस्वाद हॉटेल येथे ग्राहकांची गर्दी असताना तुर्भे बुद्रुक गावातील तिघे तरुण मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास जेवण्यासाठी गेले असता हॉटेल मालक मनोज विठोबा शिबुगडे (रा. चरई, साळवीवाडी, ता. पोलादपूर) यांनी जेवण मिळण्यास थोडा उशीर होईल, असे सांगितले. यामुळे तीनही तरुणांना राग आला आणि आणि नागेश शिंदे याने तक्रारदार हॉटेल मालक मनोज शिबुगडे (55) यांच्या कानाखाली आणि सचिन गोळे याने हॉटेल मालकाचा मुलगा शुभम शिबुगडे (25) याला डोक्यात व हातावर प्लेट मारून दुखापत केली. तसेच तिसरा तरुण महेश शिंदे याने हॉटेल मालकाची मुलगी ऋतुजा हिच्या पोटात लाथ मारली. तिन्ही तरुणांनी हॉटेल मालक व त्याच्या मुला-मुलीला धक्काबुक्की केली. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या राड्याचा गुन्हा बुधवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास पोलादपूर पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक फौजदार सरोदे यांनी दाखल केला. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी हॉटेल मनस्वाद येथे तातडीने पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत जाऊन पुढील कायदेशीर कारवाई केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सतीश कदम हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Exit mobile version