पाकिस्तानी खेळाडूंची होणार झाडाझडती

। लाहोर । वृत्तसंस्था ।

आठ महिन्यांपूर्वी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर आता टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत साखळीतच गाशा गुंडाळावा लागलेल्या पाकिस्तानी खेळाडूंची त्यांच्या क्रिकेट मंडळाकडून झाडाझडती होणार आहे. त्यांना देण्यात येणार्‍या मानधनात कपात करण्याचे संकेत पाक मंडळाने दिले आहेत. पावसामुळे त्यांची संधी हुकली असली तरी स्पर्धेत अगोदर अमेरिका आणि नंतर भारताकडून झालेल्या पराभवामुळे त्यांचा पाय खोलात गेला होता. जवळपास सर्वच खेळाडूंकडून झालेल्या सुमार खेळामुळे त्यांच्या सर्वच माजी खेळाडूंनी टीकेचे आसूड ओढलेले आहेत. आता तर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने खेळाडूंच्या नाड्या आवळण्याचे संकेत दिले आहेत.

पाक मंडळाचे अगोदरचे अध्यक्ष झाका अश्रफ यांच्या कार्यकाळात खेळाडूंबरोबर करण्यात आलेले करार रद्द करावे, असा सल्ला काही पदाधिकार्‍यांनी विद्यमान अध्यक्ष मोहसिन नकवी यांना दिला आहे. मुळात सर्व करारांचा फेरआढावा घेण्यात येणार आहेत आणि तसे झाल्यास खेळाडूंना मिळणार्‍या मानधनात कपात होऊ शकेल. मोहसिन नकवी हेसुद्धा खेळाडूंवर कारवाई करण्याच्या मनःस्थितीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारतात झालेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेअगोदरच्या आशिया करंडक स्पर्धेतही पाकचा संघ पाचव्या स्थानावर आला होता. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही; परंतु कडक उपाययोजनांवर आम्ही अध्यक्षांशी चर्चा करणार आहोत, असे मंडळातील एका पदाधिकार्‍याने सांगितले. झाली होती पगारवाढगतवर्षी तत्कालीन अध्यक्ष झाका अश्रफ यांनी खेळाडूंच्या मानधनात मोठी वाढ केली होती. तसेच, पीसीबीला मिळणार्‍या उत्पन्नातून खेळाडूंना ठराविक रक्कमही देण्याचाही करार झाला होता. आता यात कपात होणार हे जवळपास निश्‍चित आहे. ही विश्‍वकरंडक स्पर्धा जिंकली तर प्रत्येक खेळाडूला एक लाख डॉलरचे अतिरिक्त बक्षीस देण्याची घोषणा आत्ताचे अध्यक्ष नकवी यांनी केली होती.

Exit mobile version