खारघर गोल्फकोर्ससाठी ८७३ वृक्षांची तोड

| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर येथील गोल्फकोर्सच्या विस्तारासाठी 873 झाडांची तोड करण्याचा निर्णय सिडकोने घेतला असून यासाठी हरकती देण्याचे आवाहन केले होते. यासाठी 20 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र दिलेल्या किती हरकती आल्या याची माहिती सिडकोकडून दिली जात नाही. सिडकोने 873 झाडे तोडण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. यातील 727 सुरूच्या झाडांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले होते. तरीही याला पर्यावरण प्रेमींकडून तीव्र विरोध कायम होता. मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्यात येतील असे सांगण्यात येत होते.

त्यानुसार सिडकोकडे मोठ्या प्रमाणात हरकती आल्याची शक्यता आहे. मात्र या बाबत माहिती देण्यात येत नाही. याबाबत सिडकोच्या माहिती व जनसंपर्क विभागाला विचारणा केली असता अद्याप माहिती आली नसल्याचे सांगत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून या बाबत माध्यमांकडून विचारणा होत आहे. पर्यावरणवाद्यांनी गोल्फकोर्स व परिसरातील वृक्षतोडीला विरोध केला असला तरी सिडको झाडे तोडण्यावर ठाम आहेत. खारघर हा नवी मुंबईतील एकमेव नोड असा आहे तेथे निसर्ग आहे. त्यामुळे जैवविविधता दिसून येत असून विवध प्रकारचे पक्षी येथे वास्तव्यास आहेत. मात्र विकासाच्या नावाखाली याच सौंदर्यावर घाला घातला जात आहे.

आधी झाडांचे पुनर्रोपण करा
एक रोपट्याचे झाड होण्यासाठी व झाडाचे वृक्ष होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यामुळे प्रथम सिडकोने झाडांचे यशस्वी पुनर्रोपण करून दाखविल्यानंतर गोल्फकोर्सचा विस्तार करावा अशी पर्यावरणवाद्यांची भूमिका आहे. मात्र सिडकोतील अधिकारी नागरिकांच्या नैसर्गिक न्यायाकडे पाठ करत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संताप आहे. आरेप्रमाणे आंदोलन उभे करण्याच्या तयारीत पर्यावरणप्रेमी आहेत.

मी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडे आपण मागितलेली माहिती विचारली. यासाठी दोन वेळा पाठपुरावा केला मात्र ती अद्याप मिळालेली नाही. माहिती आल्यावरच ती आपणास देण्यात येईल.

– प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको मंडळ


Exit mobile version