सोशल मिडीयावर राहणार सायबरची नजर

 । अलिबाग । प्रतिनिधी ।

मेसेज, छायाचित्र व व्हीडीओ सोशल मिडीया अथवा अन्य माध्यमांद्वारे टाकून धार्मिक, जातीय तेढ निर्माण होण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रायगड पोलीस दलातील सायबर सेलच्या माध्यमातून यावर नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना जातीय कलह निर्माण होणारे व्हिडीओ, फोटो, मेसेज व्हायरल करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये मोबाईलचा वापर प्रचंड वाढला आहे. सर्वसामान्यांपासून वेगवेगळया स्तरावरील मंडळींकडे अँड्रॉईड मोबाईल आहेत. या मोबाईलद्वारे सोशल मिडीयामार्फत वेगवेगळे मेसेज, व्हीडीओ पाठविले जातात. त्यात काही जण शुभेच्चा देणारे मेसेज पाठवितात. तर काही जण शुभ सकाळ, शुभ रात्रीचे मेसेज पाठवित असतात. परंतू त्यातील काही मंडळी जातीय कलह निर्माण होण्यासाठी वेगवेगळे  मेसेज पाठवून समाजात वाद निर्माण करण्याचा धोका नाकारता येत नाही. जाती, धर्मात कलह निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची भिती अधिक आहे. रायगड जिल्हयात अनेक जाती, धर्माची लोक राहतात. जिल्हयामध्ये एकतेचा संदेश कायम निर्माण व्हावा यासाठी रायगड पोलीसांनी एक पाऊल पुढे टाकत जातीय मेसेज पाठविणार्‍यांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. खोट्या बातम्या आणि अफवांवर विश्‍वास ठेवू नका. सामाजिक सलोखा, राखण्यास सहकार्य करावे. कोणत्याही समाजविघातक कृत्यात सहभागी होऊ नका.

जातीय, धार्मिक  तेढ निर्माण करणारे मेसेज व्हायरल करणे. वेगवेगळ्या पोस्ट  शेअर झाल्यास ग्रुपमधील अ‍ॅडमीन यांना देखील जबाबदार धरून त्यांच्याविरोधात
कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकारच्या कृत्यांवर पोलीसांची नजर राहणार आहे. त्यासाठी सायबर सेलचे विशेष पथक सोशल मिडीयावर लक्ष ठेवून राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सोशल मिडीयाचा गैरवापर करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.  

Exit mobile version