| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शुक्रवार दिनांक 04 ऑक्टोबर 2024 रोजी महाविद्यालयाचा एन.एस.एस विभाग आणि श्रीवर्धन पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, मसायबर सुरक्षाफ या विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. महाविदयालयाचे प्राचार्य, डॉ. श्रीनिवास श्रीनिवास जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक, उत्तम रीकामे तसेच ‘अंशु’ या संस्थेचे, निलेश गुंडो या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक होते.
पी.एस.आय. उत्तम रिकामे यांनी व्यासपीठावरून मार्गदर्शन करताना, ‘सध्या देशात आणि राज्यात जे ऑनलाईन फ्रॉड सर्रासपणे होत आहे, त्याची घडणारी अनेक उदाहरणे देऊन कशी काळजी घ्यावी’ या विषयी सजग केले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. श्रीनिवास जोशी यांनी अध्यक्षपदा वरून बोलताना, ‘प्रत्येक व्यक्तीकडे आता मोबाईल असल्याने बँकींग व्यवहार जपूनच करायला हवेत व तरुणांनी आपल्या पालकांनाही सजग करावे’, असे आवाहन केले. या प्रसंगी पी.पी.टी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून ‘अंशु’ या संस्थेचे एनजीओ, निलेश गुंडो यांनी, ‘कोणकोणत्या अँपच्या माध्यमातून विविध फ्रॉड होत असतात व कोणती खबरदारी घेण्यात यावी’, या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन एनएसएस विभाग प्रमुख, उपप्राचार्य प्रा. किशोर लहारे यांनी व्यक्त केले. तर सुत्रसंचालन प्रा. नवज्योत जावळेकर यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारीवर्ग, विद्यार्थी-स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाबदल स्थानिक व्यवस्थापन समिती व गोखले संस्थेच्या वरिष्ठांकडून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.