सायबर चोरांचे पोलिसांना आव्हान

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबईमध्ये वाढत्या नागरीकरणामुळे गुन्ह्यांच्या प्रमाणातदेखील वाढ झाली आहे. 2022 या वर्षामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, महिलांविषयक गुन्हे, वाहनचोरी, मालमत्ता विषयक, प्राणांतिक अपघात अशा गुन्ह्यांचा आलेख चढता राहिला आहे. मात्र, शहराला आता सायबर गुन्हेगारांनीदेखील लक्ष्य केले असल्याने नवी मुंबईत स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्यात येणार आहे.

नवी मुंबई शहरात गेल्या वर्षभरात झालेल्या विविध गुन्ह्यांबाबतचा अहवाल पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. याच अनुषंगाने शहरात नोंदवल्या गेलेल्या विविध गुन्ह्यांची माहिती पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. यावेळी महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्यात नवी मुंबई पोलिसांना चांगले यश मिळाले असले तरी भविष्यात नवी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखतानाच नवी मुंबईकरांना सुरक्षित व निर्भय वातावरण निर्माण करण्याबाबत पोलीस कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील शहरांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच नागरिकांच्या समस्या व तक्रारींना जलद प्रतिसाद देणे, वाहतूक व्यवस्थापन करणे त्याचप्रमाणे गुन्ह्यांची उकल करून दोषसिद्धीसाठी प्रयत्न करणार असल्याचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले.

दरम्यान, बलात्कार 236 गुन्हे घडले असून या गुन्ह्यांमध्ये 12 ने वाढ झाली असली तरी यातील सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे, बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे लग्नाचे प्रलोभन दाखवून, मित्र अथवा ओळखीतून झाले आहेत. खुनाचे 39 गुन्हे घडले असून, त्यापैकी 38 गुन्हे उघडकीस आले आहेत. चैन स्नॅचिंगचे 147 गुन्हे घडले असून, यात 39 ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. घरफोडीच्या 397 गुन्ह्यांची नोंद झाली असून, यातील फक्त 143 (36 टक्के) गुन्हे उघडकीस आले आहेत. शहरात वाहनचोरीच्या 1016 गुन्ह्यांची नोंद आहे. यातील फक्त 239 गुन्हेच (24टक्के) उघडकीस आले. तर, विनयभंग शहरात 251 गुन्हे घडले होते, त्यापैकी 239 गुन्हे उघडकीस आले आहेत.

सायबर गुन्ह्यांचा आलेख देखील वाढला आहे. वर्षभरात सायबर संबंधित 172 गुन्हे दाखल होते, तर 2022 मध्ये 207 गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे वाढत्या सायबर गुन्ह्यांसोबत महिला विषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येणार आहे.

मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त, नवी मुंबई

बलात्काराचे सर्वाधिक गुन्हे
लग्नाचे प्रलोभन दाखवून, मित्र अथवा ओळखीच्या व्यक्तीकडून किंवा नातेवाईकांकडून झाल्याचे आढळून आले आहे. यातील 131 बलात्काराचे गुन्हे हे अल्पवयीन मुलीसोबत घडले आहेत. तर उर्वरित 105 गुन्हे हे सज्ञान मुलीसोबत घडलेले आहेत. बलात्काराच्या गुन्ह्याप्रमाणेच विनयभंगाच्या गुन्ह्यात देखील 37 ने वाढ झाली आहे.

Exit mobile version