पांडवकडा संवर्धनासाठी सायकल रॅली

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

। पनवेल । प्रतिनिधी ।

जैवविविधतेने नटलेल्या खारघरच्या टेकड्या आणि पांडवकडा धबधबा वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय पर्वतदिनानिमित्त रविवारी खारघर डोंगरावर सायकल रॅली काढून सार्वजनिक स्वाक्षरी मोहीम राबवली. या उपक्रमात ऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह 50 हून अधिक सायकलप्रेमी सहभागी झाले होते. वेटलँड्स अँड हिल्स, नॅटकनेक्ट फाउंडेशन आणि पनवेल वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्वतदिनानिमित्त उत्सव चौक ते खारघर डोंगर अशी सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती.

खारघर डोंगर येथे विकासाच्या नावाखाली गेल्या काही वर्षांत येथे मोठ्या प्रमाणावर सपाटीकरण झाल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. या भागात 487 दुर्मिळ वनस्पतींसह अनेक वनस्पती प्रजाती, 295 कीटक प्रजाती, 15 अपृष्ठवंशी प्राणी, 12 मासे, 9 उभयचर, 28 सरपटणारे प्राणी, 179 पक्षी आणि 12 सस्तन प्राण्यांच्या प्रजातींची नोंद संशोधकांनी केली आहे. उत्सव चौक ते खारघर डोंगर काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार, खारघर वेटलँड्स अँड हिल्स फोरमच्या निमंत्रक ज्योती नाडकर्णी, सुदीप आठवले यांच्यासह मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते.

Exit mobile version