| सिकंदराबाद | वृत्तसंस्था |
उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदराबादमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. सिकंदराबादमधील एका कॉलनीत सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये पाच जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच या घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. इतकंच नाही तर या सिलिंडरच्या स्फोटामध्ये दोन मजली घर देखील कोसळलं आहे. घर कोसळल्यामुळे घराच्या ढिगार्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 8.30 ते 9 वाजताच्या दरम्यान सिकंदराबाद परिसरात घडली. या घटनेत एक महिला आणि दोन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, बुलंदशहरमधील सिकंदराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वसाहतीमध्ये ही घटना घडली. या घटनेबाबतची माहिती मेरठ झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ध्रुव कांत ठाकू यांनी दिली. सिलिंडरच्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून ढिगार्याखाली काही जण अडकल्याची माहिती आम्हाला मिळाली असून मदतकार्य सुरु असल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालक ध्रुव कांत ठाकू यांनी सांगितलं.