। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
प्रो-कबड्डीच्या 11व्या पर्वात सोमवारी (दि.9) दबंग दिल्लीने वेगवान आणि खोलवर चढाई करणार्या आशु मलिकच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर घरच्या मैदानावर पुणेरी पलटणचा 30-26 असा पराभव केला आहे. या विजयाने दबंग दिल्लीने बाद फेरीच्या आशा भक्कम करताना चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर, पुणेरी पलटण मात्र सातव्या स्थानावर आहे. यामुळे गतविजेत्या पुणेरी पलटणला आता उर्वरित प्रत्येक सामना जिंकावाच लागणार आहे. अन्यथा त्यांना बाद फेरी गाठता येणार नाही.
पूर्वार्धात बचावपटूंनी आपल्या संघाचे आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. उत्तरार्धात मात्र पुणे संघाने चढाई आणि बचाव अशा दोन्ही आघाडीवर खेळ उंचावताना दिल्ली संघावर दडपण आणण्याचा चांगला प्रयत्न केला होता. मात्र, उत्तरार्धाच्या तिसर्याच मिनिटाला आशु मलिकच्या एका चढाईतील पाच गुणांनी सामन्याचे चित्र बदलले. त्यानंतरही पुणे संघाच्या अबिनेश नंदराजन आणि मोहित गोयत यांनी दोनवेळा अव्वल पकड करताना त्या पाच गुणांचे दडपण झुगारले होते. मात्र, आशु आणि महत्वाच्या क्षणी नवीनकुमारला रोखण्यात पुणे संघाची बचावफळी चुकली.
सामना 21-21 अशा बरोबरीत असताना नवीनच्या एका खोलवर चढाईत पुणे संघाचे दोन्ही कोपरारक्षक स्वयंचित झाले आणि आशुच्या पाच गुणानंतरही आव्हान राखलेल्या पुणे संघासाठी ही सर्वात मोठी चूक ठरली. ही संधी साधून नंतर आशु आणि नवीनने चोख चढाया करुन दोन मिनिट शिल्लक असताना पुणे संघावर लोण चढवत 29-25 अशी भक्कम आघाडी केली. त्यानंतर पुन्हा एकदा सावध खेळ करुन दिल्ली संघाने विजयाला गवसणी घातली.







