| रायगड | प्रतिनिधी |
अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी कळल्यावर खूपच वाईट वाटले. त्यांच्या निधनाच्या बातमीने सुन्न झालो. अजितदादा हे एक स्पष्टवक्ते होते. दिलेले शब्द पाळणारे नेते म्हणून महाराष्ट्रात होते. महाराष्ट्र स्तरावरील सर्व संस्थांसोबत काम करताना जवळीकता आली. ही जवळीकता कायम राहिली. विधिमंडळामध्ये अभ्यासपूर्ण आणि वाचन करून उत्तर देणारे नेते होते. आमच्या तीन पिढ्यांचे पवार कुटुंबियांसोबत संबंध आहेत. ते आजही कायम आहेत.
व्यक्तीगत संबंध कधीही सोडले नाही. दादांसोबत मार्केटिंग फेडरेशन व अन्य संस्थांमध्ये काम करताना निर्णय प्रक्रियेमध्ये मला घेण्यामध्ये त्यांचे एक वाखाणण्याजोगे काम होते. महाराष्ट्रात आज गरज असताना, अजितदादांचे असे अपघाती निधन होणे, ही मोठी दुर्दैवी घटना आहे. गेल्या महिन्यामध्ये एका कामानिमित्त शरद पवार, अजित पवार व मी असे तिघेजण एकत्र बसलो होतो. तीन तास गप्पागोष्टी करीत होतो. ती आठवण सतत येत आहे. अजितदादांचा मोकळेपणा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी शेकाप व पाटील कुटुंबियांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आम्ही आमचा कुटुंब प्रमुख गमावला : खासदार सुनील तटकरे
आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने आम्ही आमचा कुटुंबप्रमुख गमावला आहे. त्यांचे आकस्मिक निधन हे धक्कादायक आणि मन पिळवटून टाकणारे आहे. त्यांच्या निधनाने एक कुशल प्रशासक, अभ्यासू, रोखठोक आणि सदैव ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणारे कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी दिली.
गेली अनेक वर्षे दादांसोबत काम केले असून, ज्या-ज्या वेळी आमची भेट झाली, त्या प्रत्येक वेळी दादा हे शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर ठाम राहूनच काम केले पाहिजे, यावर भर द्यायचे. महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत, ही त्यांची कायमची आग्रही भूमिका होती. शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची तळमळ आणि संवेदनशीलता मी अगदी जवळून अनुभवली आहे.
माझ्या वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात अजितदादांचे मार्गदर्शन, विश्वास आणि पाठबळ मला सदैव लाभले. कठीण निर्णयांच्या प्रसंगी त्यांची स्पष्ट व ठाम भूमिका, प्रशासनावरची मजबूत पकड आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी आम्हा सर्वांसाठी नेहमीच दिशादर्शक ठरली. त्यांच्या नेतृत्वशैलीतून अनेक कार्यकर्ते घडले.
आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद आणि काळा दिवस ठरला आहे. अजितदादांचे असे आकस्मिक जाणे ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मात्र त्यांचे विचार, कार्य आणि सर्वसामान्य जनतेसाठीचे अमूल्य योगदान सदैव आमच्यासाठी प्रेरणादायी राहील. या दुःखाच्या क्षणी पवार कुटुंबियांच्या शोकात सहभागी आहे. ईश्वर पवार कुटुंबियांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना, खा. तटकरे यांनी व्यक्त केली.
दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला : देवेंद्र फडणवीस
अजित पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता. अजित दादा हे संघर्षातून तयार झालेले नेतृत्व होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्राकरिता आजचा दिवस अतिशय कठीण आहे. कधही भरुन न निघणारे नुकसान महाराष्ट्राचे झाले आहे. अशा प्रकारचे लोकनेते गेल्यानंतर जी पोकळी निर्माण होते, ती भरुन काढणे कठीण आहे. अतिशय संघाच्या काळात आम्ही सोबत काम केलेले आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयारच होत नाही. माझा दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मोठा भाऊ हरपला : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे मला माझा मोठा भाऊ हरपल्याचे दुःख झाले आहे, अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. अजित पवार वयाने मोठे होते. आम्ही राजकारणात एक टीम म्हणून काम करत असलो तरी, एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे.
अजितदादांचे महाराष्ट्र, देशाच्या विकासात मोठे योगदान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. या अपघाताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही मित्रांना आपल्यापासून दूर नेले आहे. अजितदादांनी महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी नेहमीच सक्रियपणे काम केले. अजित पवार यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
कधीही भरून निघणारी हानी : राष्ट्रपती मुर्मू
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली, त्यांच्या मृत्यूला अकाली निधन म्हटलं आणि महाराष्ट्राच्या विकासातील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल त्यांचे स्मरण केलं. “महाराष्ट्रातील बारामती इथं झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक लोकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. अजित पवारजी यांचं अकाली निधन ही एक कधीही भरून न येणारी हानी आहे. महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकार क्षेत्रात दिलेल्या त्यांच्या विशेष योगदानाबद्दल त्यांना नेहमीच स्मरणात ठेवलं जाईल,“ असं राष्ट्रपतींनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. “मी त्यांच्या कुटुंबियांना, समर्थकांना आणि चाहत्यांना माझ्या संवेदना व्यक्त करते. या अपघातात ज्या इतरांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,” असंही त्या पुढे म्हणाल्या.
राज्याचं झालेलं नुकसान भरुन येणार नाही : शरद पवार
अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याचे फार मोठे नुकसान झाले असून, ते कधीही भरुन येणार नाही. हा निव्वळ अपघात आहे, याच्यामध्ये राजकारण करु नका, अशी विनंती शरद पवार यांनी केली.
