महाडमध्ये तटकरे अपेक्षीत मताधिक्यापासून दूर
| रायगड | आविष्कार देसाई |
महाड विधानसभा मतदार संघातून 20 हजारांचे मताधिक्य देण्याची वल्गना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केली होती, मात्र प्रत्यक्षात फक्त तीन हजार 616 एवढेचे मताधिक्य महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना देऊ शकले आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, शिंदे गट येथे सुमारे 16 हजार मतांनी मागे पडला आहे. तसेच तटकरेंना येथे अपेक्षीत मताधिक्य न मिळाल्याने आगामी होणार्या विधानसभेला ते गोगावलेंना मदत करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे गोगावलेंची पुढील राजकीय वाटचाल सोपी नसल्याचे बोलले जाते.
राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील झाल्याने गोगाले यांच्या मंत्री पदावर गंडातर आले होते. दोन वेळा त्यांना मंत्रीपदाती हुलकावणी मिळाली, परंतू मागून सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीतील आदिती तटकरे यांची वर्णी थेट कॅबीनेट मंत्रीपदी झाल्याने गोगावले समर्थकांची तळपायाची आग मस्तकात गेली होती. पुढे मंत्री पद पदरात पडेल अशी भाबडी आशा गोगावले अद्यापही बाळगून आहेत. महायुतीच्या माध्यमातून रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरेंना उमेदवारी दिल्याने गोगावले यांना तटकरे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणे क्रमप्राप्त झाले. तटकरे यांच्यामुळेच मंत्रीपद हुकले होते. त्यांचाच प्रचार करण्याची वेळ गोगावले यांच्यावर आली. तटकरे यांना 40 हजारांचे मताधिक्य देण्याचे गोगावले यांनी बोलून दाखवले होते. त्या बदल्यात विधानसभेच्या निवडणूकीत आम्हाला मदत करा, असेही ते म्हणाले होते. मतदान पार पडल्यावर मतदानाचा टक्का घसरल्याने किमान 20 हजारांचे मताधिक्य तरी देऊ, असे गोगावले समर्थकांनी सांगितले होते.
आता मतदान यंत्र उघडल्यावर प्रत्यक्षात फक्त तीन हजार 616 एवढेच मताधिक्य तटकरेंना मिळाले आहे. विशेष म्हणजे महाड शहर आणि खाडी पट्ट्यात देखील तटकरेंना पाहीजे तसे मताधिक्य मिळाले नाही. येथील सच्च्या शिवसैनिकांनी कोणत्याही सोयी-सुविधा नसताना रक्ताचे पाणी करुन गीतेंचा प्रचार केला. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन आले. याचे श्रेय महाडमधील शिवसनेच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांला नक्कीच जाते. मतदार संघातील निजामपूरमध्ये तटकरे हे गीतें पेक्षा सुमारे सहा हजार मतांनी पुढे राहीले. महाड विधानसभा मतदार संघावर वर्चस्व असणार्या गोगावलेंची मदत तटकरेंसाठी फारच तोकडी पडल्याचे आकडेवारीवरुन दिसते. तटकरे आता त्यांना पडलेली मते पाहून आगामी विधानसभेच्या निवडणूकीत गोगावले यांना मदत करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. गोगावलेंची पुढील राजकीय वाटचाल थोडी अवघडच राहणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गोगावले स्वतःला कसे निभावून नेणार, यातून ते कसे आत्मपरिक्षण करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.