शेकाप पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत, प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत, प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि.27) दुपारी तीन वाजल्यापासून अलिबागमध्ये शेतकरीभवनसमोर दहीहंडीचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचे आणखी एक वेगळे वैशिष्टय म्हणजे पहिल्यांदाच अलिबागमध्ये महिला गोविंदा पथकांसाठी दहीहंडी स्पर्धा ठेवण्यात आली आहे.
अलिबागच्या दहीहंडी उत्सवाचे आकर्षण अलिबागकरांसह संपूर्ण रायगडकरांना कायमच राहिले आहे. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने गोपाळकाला निमित्त गेल्या अनेक वर्षापासून दहीहंडी फोडण्याचा सोहळा साजरा केला जात आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील लाखो नागरिक या सोहळ्याला उपस्थित राहून दहीहंडी स्पर्धा बघण्याचा आनंद घेतात. दहीहंडी उत्सव सोहळा अवघ्या पाच दिवसांनी रंगणार आहे.
शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत, प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने यावर्षीदेखील दहीहंडी उत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा अलिबाग तालुक्यापुरती मर्यादीत असणार आहे. दहीहंडी फोडणार्या पुरुषांच्या पथकाला प्रथम क्रमांकाचे रोख एक लाख 31 हजार 111 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुष पथकाच्या पाच थरांच्या सलामीला पाच हजार रुपये, सहा थराच्या सलामीला अकरा हजार रुपये देण्यात येणार आहेत.
तसेच या स्पर्धेत यंदा अलिबागमध्ये प्रथमच महिला गोविंदा पथकासाठी दहीहंडी स्पर्धा ठेवली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या गोविंदा पथकाला 51 हजार 111 रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच चार थरांची सलामी देणार्या महिला गोविंदा पथकाला पाच हजार रुपये व पाच थरांची सलामी देणार्या पथकाला अकरा हजार रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे. दहीहंडी उत्सव जल्लोषात व अधिक चांगल्या पध्दतीने साजरा व्हावा यासाठी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार तयारी सुरु करण्यात आली आहे.