चषकांचे जल्लोषात अनावरण
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत दहीहंडी सोहळा मानाचा व प्रतिष्ठेचा मानला जातो. मंगळवारी (दि.27) अलिबाग शहरात हा सोहळा रंगणार आहे. यानिमित्ताने अलिबागमधील शेकाप भवन कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (दि.23) महिला व पुरुष गोविंदा पथकाच्या चषकांचे अनावरण करण्यात आले. अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, अॅड. गौतम पाटील, यतीन घरत, नील नाईक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर दुसर्या दिवशी गोपाळकाला सण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्त शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित दहीहंडी स्पर्धेचा सोहळा यंदाही अलिबागमधील शेतकरी भवन येथे रंगणार आहे. त्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असून, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार नियोजन करण्यात येत आहे. एकूण नऊ समित्या तयार करण्यात आल्या असून, 70 हून अधिक सदस्यांचा यामध्ये सहभाग आहे. गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी डॉक्टरांसह रुग्णवाहिका आदी वैद्यकीय पथक सज्ज असणार आहे. दरम्यान, दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी शेतकरी भवन येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
दहीहंडी उत्सवात सहभाग घेणार्या गोविंदा पथकांना अटी व शर्तींची माहिती अॅड. गौतम पाटील यांनी दिली. नेमण्यात आलेल्या समितीची माहिती यतिन घरत यांनी देऊन योग्य ती जबाबदारी खंबीरपणे पार पाडण्याची सूचना केली. यावेळी सतीश प्रधान, अशोक प्रधान, संदीप शिवलकर, वृषाली ठोसर, संजना किर, राकेश चौलकर, कपिल अनुभवणे, नागेश कुलकर्णी, अश्वीन लालन, अॅड. आशिष रानडे, सुषमा पाटील, महेश शिंदे आदींसह गोविंदा पथकांचे प्रतिनिधी, मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
बक्षिसांची खैरात
दहीहंडी उत्सवासाठी 52 गोविंदा पथकांनी नोंदणी केली आहे. दहीहंडी फोडणार्या पुरुषांच्या पथकाला प्रथम क्रमांकाचे रोख एक लाख 31 हजार 111 रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुष पथकाच्या पाच थरांच्या सलामीला पाच हजार रुपये, सहा थरांच्या सलामीला अकरा हजार रुपये देण्यात येणार आहे. यंदा अलिबागमध्ये प्रथमच महिला गोविंदा पथकासाठी दहीहंडी स्पर्धा ठेवली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या गोविंदा पथकाला 51 हजार 111 रुपये व चषक देण्यात येणार आहे. तसेच चार थरांची सलामी देणार्या महिला गोविंदा पथकाला पाच हजार रुपये व पाच थरांची सलामी देणार्या पथकाला अकरा हजार रुपये देऊन सन्मानित केले जाणार आहे.