। सुकेळी । वार्ताहर ।
बोल बजरंग बळी की जय “ ढाकु माक्कुम .. ढाकु माक्कुम.. च्या नादांत रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात सर्वत्र दहीहंडी उत्सव अतिशय उत्साहमय वातावरणात पार पडला. नागोठणे विभागातील बाळसई गावामध्ये देखिल दहिहंडी उत्सव हा अंत्यंत पारंपारिक पध्दतीने तसेच उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. वरुणराजाने सुद्धा सकाळपासूनच दमदार हजेरी लावल्यामुळे गोविंदामध्ये उत्साह संचारला होता. त्यामुळे सर्वत्र जल्लोष पहावयास मिळाला. बाळसई गावामध्ये यावर्षी देखिल बालगोपाळांनी दहीहंडीचा मनसोक्त आनंद लुटला.
बाळसई गावातील महत्वाची अशी मानाची हंडी ही परंपरेनुसार अनंत ठमके यांच्याकडून बांधण्यात येते. यावर्षीही बांधण्यात आलेली ही हंडी चार थर लावुन बाळगोविंदांनी फोडली. गोविंदांनी साखळी पकडुन “ बोल बजरंग बळी की जय“ च्या ताळावर सर्वच गोविंदांनी ठेका धरला होता. तसेच पारंपारिक पद्धतीची गौळणीची गाणी बोलत त्याच्यावर देखिल बाळगोविंदा नाचण्याचा मनसोक्त आनंद लुटला. त्याचप्रमाणे परंपरेनुसार सुरू असलेल्या अनेक कान्होंबा भक्तांच्या अंगात कान्होंबाचे वारे देखिल आले होते. मानाची हंडी फोडल्यानंतर गावामध्ये ईतरत्र बांधण्यात आलेल्या 5 ते 6 दहिहंड्या फोडुन दहीहंडी उत्सव बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अतिशय उत्साही वातावरणात पार पडला.