। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद शाळा, साखर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम अतिशय उत्साहात व जल्लोषात पार पडला. विद्यार्थी आणि पालक यांनी दहीहंडीचा मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारसा लाभावा व ऐक्य निर्माण व्हावे हा यामागील मुख्य हेतू आहे. सदर कार्यक्रमासाठी पालक मोहन गण यांनी स्वेच्छेने स्पीकर व्यवस्था उपलब्ध करून दिली. किरण बुरांडे यांनी स्वखर्चातून दहीहंडी सजावट, दहीहंडी बांधणे यासाठी विशेष सहकार्य केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हरेश्वर गोतकर, तसेच सर्व पालक, महिला वर्ग, ग्रामस्थ यांनी देखील उत्तम सहकार्य केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, उपशिक्षिका स्मिता चिखले, अमिषा मुंढे, अंगणवाडी सेविका रिमा गुरव, मदतनीस मंजुळा लाड, स्वयंपाकी मनीषा गुरव, मदतनीस कमल तांडेल यांचे देखील उत्तम सहकार्य लाभले. तसेच सदर कार्यक्रमासाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक प्रधान गुरुजी देखील आवर्जून उपस्थित राहिले.