तळा तालुक्यात दहीकाला उत्साहात

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यात पारंपरिक पद्धतीने जल्लोषात दहीकाला उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बाळगोपालांसह जेष्ठ नागरिक देखील आनंदाने दहीकाला उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी पारंपरिक पद्धतीने खालुबाजाच्या ठेक्यावर बाळ गोविंदांनी फळी धरली होती.

तळा शहरातील बारा वाड्यातील दहीहंड्या सायंकाळी पारंपरिक पद्धतीने मानवी मनोरे रचून फोडण्यात आल्या. दहीकाला उत्सवाच्या आदल्या रात्री श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. तालुक्यातील रोहिदासनगरमध्ये कृष्ण जन्माष्टमीला चौरंगावर पाळण्यात श्री कृष्णाची मूर्ती स्थापन केली होती. रात्री 12 वाजता गावातील मंडळींनी मनोभावे देवाची आरती केली व नंतर पाच सुहासिनींमार्फत श्रीकृष्णाचा पाळणा हलवून पारंपारिक गीत गाउन कृष्णजन्माष्टमी साजरी केली. तसेच, दुसऱ्या दिवशी गोपाळकाला खेळण्यास सुरुवात झाली. गोपाळकाला खेळताना पारंपरिक पद्धतीने फळी धरली होती. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांनी फळी धरून खालुबाजावर ठेका धरला होता. संध्याकाळच्या सुमारास होळीच्या मैदानावर काठी ओढाओढी, पायांच्या कैचीतून सुटका करणे आदी खेळ खेळण्यात आले. यानंतर तीन थर लावून मुख्य दहीहंडी फोडण्यात आली.

Exit mobile version