दुभत्या जनावरांना मिळणार पोषक हिरवा चारा

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
दुभत्या जनावरांना पोषक आहार मिळावा यासाठी रायगड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्वारी, बाजारी पिकांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील एक हजार 904 लाभार्थ्यांना प्रत्येकी हायब्रीड, बाजार न्युट्रीफीड व हायब्रीड स्वीट जवार शुगर केज यांचे अडीच किलो बियाणे शंभर टक्के अनुदानातून वाटप केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो दुधाळ जनावरांना पोषक हिरवा चारा मिळणार आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये भातपिकांबरोबरच अनेक शेतकरी पशुपालनावर अधिक भर देत आहेत. त्यात काही जण पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत. काही शेतकरी बकरी, बोकड पालन, तर काही शेतकरी दुधाळ जनावरे पालनांचा व्यवसाय करीत आहेत. या वेगवेगळ्या व्यवसायातून शेतकरी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये गाय, म्हैस यांची संख्या सुमारे दोन लाख 39 हजार आहे. या जनावरांमार्फत दूध विक्रीपासून शेतकर्‍यांना आर्थिक आधार मिळत आहे. परंतु, या दुधाळ जनावरांना पोषक आहार मिळत नसल्याने अनेक वेळा दुधाचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे शेतकर्‍यांना खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण होते.

रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी रायगड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत वैरण उत्पादन योजना सुरु करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एक हजार 904 लाभार्थ्यांची या योजनेसाठी निवड केली आहे. त्यांना त्यांच्या जागेमध्ये ज्वारी, बाजरी पिकाची लागवड करता येणार आहे. त्यासाठी प्रत्येकाला हायब्रीड बाजार न्युट्रीफीड एक किलो व हायब्रीड स्वीट जवार शुगर केज दीड किलो असे अडीच किलो बियाणे लागवडीसाठी दिले जाणार आहे. त्यामुळे दुधाळ जनावरांच्या पोषक आहारासाठी होणारी वणवण थांबणार आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या जागेतच या पोषक आहाराची लागवड करून दुधाळ जनावरांना वैरणची व्यवस्था करता येणार आहे.

Exit mobile version