ग्राहकांच्या समस्या सोडवण्यावर भर
| सारळ | वार्ताहर |
डाक विभागाच्या ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी रायगड डाक विभागाकडून दि. 22 डिसेंबर रोजी जिल्हा अधीक्षक रायगड डाक विभाग यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहकांच्या समस्या वेगवान व प्रभावी रीतीने विनाविलंब सोडवणे हा या अदालतीमागचा उद्देश असल्याचे डाक अधीक्षक सुनील थळकर यांनी सांगितले. या डाक अदालतीमधून डाक विभागाच्या ग्राहकांच्या असणाऱ्या समस्यावर, तक्रारीवर जागेवरच निर्णय घेऊन तोडगा काढण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये स्पीड, रजिस्टर, पार्सल या तक्रारीचे सहा आठवड्यांपेक्षा जास्त दिवस असलेल्या प्रलंबित तक्रारीचे निवारण केले जाणार आहे.
या अदालतीमध्ये न्यायालयात असणारी, कायदेशीर प्रलंबित असणारी प्रकरणे समाविष्ट करता येऊ शकत नाहीत. दि. 21 डिसेंबरपर्यंत कागदपत्रांसह आलेल्या तक्रारींचा या डाक अदालतमध्ये समावेश केला जाईल याची नोंद घ्यावी. संबंधित प्रकरणावर तक्रारदारांनी या आदलतीमध्ये कागदपत्रासह येऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा डाक अधीक्षक श्री. थळकर यांनी केले आहे.







