। खोपोली । प्रतिनिधी ।
देशभरातील दलित, मुस्लीम समाज मोदींविरोधात एकवटला असून, आता सत्तापरिवर्तन अटळ आहे. जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून, मोदींना सिंहासनावरुन पायउतार केल्याशिवाय आता स्वस्थ बसायचे नाही, असा पण दलित, मुस्लीम समाजाबरोबरच येथील जनतेने केला आहे. त्यामुळे आता भाजपाची हुकूमशाही राजवट उलथवून गद्दारांना धडा शिकवा, अशा शब्दात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला. दरम्यान, आ. पाटील यांनी मुस्लीम समाजाच्या मोदीविरोधी देश आणि राज्यपातळीवरील संघटनेचे कौतुक केले.
इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्या प्रचारार्थ खोपोलीतील महाराजा मंगल कार्यालयात सकाळी साडेअकरा वाजता प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रसेचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख, शेकापचे अल्पसंख्याक सेलचे कार्यकर्ते अबू जळगावकर, खोपोलीच्या माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम, देवन्हावे ग्रा.पं. सदस्य भूषण कडव, आरडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप लाले, शेकापचे खोपोली शहराध्यक्ष अविनाश तावडे, शेकाप कार्यकर्ते ॲड. रामदास पाटील, खालापूरचे उपगनराध्यक्ष संतोष जंगम, रवी रोकडे, महिला शहराध्यक्ष ज्योत्स्ना रोकडे, कैलास गायकवाड, काँगेसचे रिचर्ड जॉन, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष एकनाथ पिंगळे, शरद पवार गट महिला अध्यक्ष खोपोली सुवर्णा मोरे यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. पाटील पुढे म्हणाले की, मुस्लीम समाजाने देशपातळीवर संघटन केले, राज्यपातळीवर संघटन केले, त्यामुळेच आज देशभरात मोदीविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. मोदींची, भाजपाची हुकूमशाही गाडण्याचे काम आपल्याला करायचे असून, मुस्लीम समाजाने ते काम आधीच हाती घेतले आहे, असेही आ. पाटील म्हणाले. श्रीवर्धन, मुरुडमध्ये, म्हसळ्यामध्ये प्रचारसभेदरम्यान शेकडो मुस्लीम महिलांनी इंडिया आघाडीच्या सभांना उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर केल्याचे आ. पाटील म्हणाले, आदरणीय शरद पवार आज 84 व्या वर्षीही गावोगावी पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत असून, रोज तीन-तीन सभा घेत आहेत, त्यांच्या सभांमुळे जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, विरोधकांनीही धसका घेतला आहे.
मुस्लीम समाजाला सलाम मोदींविरोधात वातावरण निर्माण करण्याचे श्रेय देशभरातील मुस्लीम समाजाचे आहे. ज्या जिद्दीने आज देशातील मुस्लीम समाज एकवटून काम करीत आहे, ते पाहता ज्यावेळी मोदी त्या सिंहासनावरुन पायउतार होतील, त्याचे श्रेय मुस्लीम समाजाला देऊन त्यांना पहिला सलाम करावा लागेल, असे आ. जयंत पाटील म्हणाले.
खा. बारणे यांनी 2014 च्या निवडणुकीच्या वेळी नामनिर्देशनपत्रामध्ये दोन कोटी अशी संपत्ती जाहीर केली होती, ती आज दहा वर्षांत दोनशे-अडीचशे कोटींच्या घरात गेली आहे. त्यांनी आता जाहीर केलेल्या संपत्तीवरुन दिसून येते. एवढी संपत्ती यांच्याकडे आली कुठून, असा सवाल आ. जयंत पाटील यांनी केला. खा. बारणे यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात जनतेचा नव्हे, तर स्वतःताच विकास केला, हे त्यांनी जाहीर केलेल्या संपत्तीवरुन सिद्ध होते, अशा शब्दात आ. पाटील यांनी बारणेंचा समाचार घेतला.