आमदार रविंद्र पाटील यांचा खळबळजनक आरोप
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील भाल येथे सुरु असलेल्या खारबंदिस्तीच्या कामात अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी ठेकेदाराकडून दोन कोटींची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप पेणचे आमदार रविंद्र पाटील यांनी ग्रामस्थांसमोर केल्याने खळबळ उडाली आहे. याचा व्हिडीओ संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल होत असून अलिबागच्या आमदारांचा पेणच्या कामात हस्तक्षेप कशासाठी असा सवाल केला जात आहे.
पेण तालुक्यात खारबंदिस्तीचे काम सुरु असून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने ग्रामस्थांनी हे काम अडवले होते. काळेश्री गावात आमदार रविंद्र पाटील हे ठेकदारासोबत बोलणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी ठेकेदाराला सुचना करीत असतानाच ग्रामस्थांनी काम करीत असताना इथे कोणी हफ्ते मागण्यासाठी येत असेल असेल तर ग्रामस्थांना सांगा त्याची जबाबदारी ग्रामस्थ घेतील असे सांगितले. त्याचवेळी आमदार रविंद्र पाटील यांनी सुनावत आपले काही लोक त्या दळवीला जाऊन भेटतात ते कशासाठी अशी विचारणा करण्यास सुरुवात केली. दोन कोटी रुपये त्यांनी मागायचे हे कशासाठी? असा सवाल करीत कंत्राटदाराकडून दोन कोटी मागितल्याचा खळबळजनक आरोपही रविंद्र पाटील यांनी केला. ही काय पद्धत आहे का असा सवालही त्यांनी यावेळी केला. त्यावर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कोणीही पैशे मागितले तरी त्याला देऊ नका. आमचे गावकीचे पंच आहेत. त्यांना येऊन सांगा आम्हाला त्रास होतोय. आम्ही येथे येऊन हजर राहू, आम्हाला काम पाहिजे. सगळ्यांसमोर विषय मांडा असेही ग्रामस्थांनी सुचवले. तुमच्याकडे कोणीही पैसे मागितले तर पेणच्या आमदारांना सांगा ते त्याचा समाचार घेतील. त्यावर एका ग्रामस्थाने दळवीच्या नावावर आक्षेप घेताच आमदार पाटील यांनी त्याला आव्हान देत दळवीला बोलावून घ्या आणि हे पैसे कसले हवेत ते कोण देणार हेही विचारा असे खडेबोल सुनावले.
संपूर्ण रायगड जिल्ह्यात हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने खळबळ उडाली आहे. सदर खारबंदिस्तीचे काम उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांनी मंजुर करण्यात आला आहे. तर सुनील पाटील हे कंत्राटदार आहेत.