गोगावलेंला डच्चू देत दळवींना हवे मंत्रीपद

यादीतून मात्र दळवींचे नाव गायब

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

राजकारणात डोहाळे लागण्याचा प्रकार वारंवार अनुभवास येतो. कधी कुणाला काय डोहाळे पडतील, याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी आ. भरत गोगावले यांना पालकमंत्रीपदाचे डोहाळे लागले होते. तर आता महेंद्र दळवी यांचे कार्यकर्ते डोहाळ्यात जगत आहेत. एकीकडे महायुतीत म्हणून एकाचा पायपोस दुसर्‍याच्या पायात नसताना त्यांच्या कार्यकर्त्यांना लागलेले त्यांच्या नेत्याच्या मंत्रीपदाचे डोहाळे नेमके कोण पुरविणार, हा प्रश्‍नच आहे.

मंत्रीपद भेटणं इतके सोपे झाले आहे की, मनात इच्छा आली की, कार्यकर्ते फलक लावून मोकळे होतात आणि मग नेत्याचेही ते फलक पाहून ऊर भरून येते. कधी गोगावलेंच्या कार्यकर्त्यांना वाटते त्यांचा नेता मंत्री व्हावा, तर कधी दळवींच्या कार्यकर्त्यांना वाटतं त्यांचा नेता मंत्री व्हावा. ज्याला वाटलं त्याने जागोजागी तोंड उघडलं. पण, भाजपच्या मनात काय, हे या बगलबच्चांना दिसत नाही. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, अशा कार्यकर्त्यांचे डोहाळे पूर्ण करण्याच्या मानसिकतेत भाजपवाले नाहीत, याची कल्पना असतानाही नेत्याला खोटी स्वप्न दाखविण्याचं काम हे कार्यकर्ते करीत आहेत. शिंदे गटात असलेले वादंग आणि नेत्यांमधील कुरघोडी पाहता, हे डोहाळे कधीही पूर्ण न होणारे आहेत, हे स्पष्ट झालं आहे. पण, तरीही तेवढ्यापुरते का होईना, कार्यकर्ते आणि भाऊंचे पण समाधान होत असल्याचे दिसून येते.

शिंदेंच्या मंत्र्यांची यादी दिल्लीत?
येत्या 14 तारखेला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्या आधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी दिल्लीत पाठवल्याची माहिती मिळतेय. येत्या 16 तारखेला नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादी अंतिम शिक्कामोर्तबसाठी दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या हायकमांडचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर विस्ताराचा मार्गही मोकळा होणार आहे. दिल्लीत पाठवलेल्या शिंदेच्या यादीमध्ये उदय सामंत, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, राजेश क्षीरसागर, प्रकाश सुर्वे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, हेमंत पाटील यांची नावं असल्याचे कळतंय.
वादग्रस्त चेहर्‍यांना संधी नाही?
दळवींचं नाव यादीत नसल्यामुळे लवकरच त्यांचे स्वप्नभंग होणार असल्याची चर्चा परिसरात सुरु झाली आहे. याशिवाय वादग्रस्त चेहर्‍यांना पुन्हा संधी नको, अशी भूमिका भाजप हायकमांडची आहे. अशातच महायुतीचे आ. दळवी यांच्यावर गुन्हा दाखल असल्यामुळे भाजप दळवींना निश्‍चितपणे नाकारणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे महेंद्र दळवी यांचं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.
Exit mobile version