बोलघेवड्या आ. दळवींचे आश्‍वासन हवेतच

आठ दिवसात निर्णय घ्या; मिनीडोअर चालकांचा अल्टीमेट

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

प्रलंबित मागण्यांसाठी मिनीडोअर चालक, मालकांनी उपोषण सुरु केले होते. आमदार महेंद्र दळवी यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेतले होते. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र एक महिना होत आला तरीही मिनीडोअर चालक, मालकांच्या प्रश्‍नांंचे निरसन झाले नाही. त्यामुळे रायगड जिल्हा विक्रम, मिनीडोअर चालक-मालक संघाने आक्रमक भूमिका घेत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 19 डिसेंबरपर्यंत प्रश्‍न मार्गी लावण्याबाबत प्रशासनासह शासनाला आठ दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. येत्या 20 डिसेंबरपासून साखळी उपोषण केले जाणार असून प्रत्येक दिवशी आंदोलन तीव्र स्वरुपाचा असणार असल्याचा इशारा रायगड जिल्हा विक्रम, मिनीडोअर चालक, मालक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी दिला आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी पदमश्री बैनाडे यांना मंगळवार (ता. 13) रोजी निवेदन देण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून रायगड जिल्ह्यातील विक्रम, मिनीडोअर चालक मालक, अनेक गंभीर समस्यांनी त्रस्त आहेत. या समस्या दुर होण्यासाठी जिल्हा पातळीवर संबंधित विभागाकडे वारंवार पत्र दिले. बैठका झाल्या, मात्र त्यावर ठोस उपाययोजना करण्यास प्रशासन उदासीन ठरले आहे. प्रत्यक्षात आश्‍वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे 10 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील मिनीडोअर चालक, मालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले होते. आ. महेंद्र दळवी यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून तीन दिवसात मागण्या मान्य होण्याबाबत तोंडी आश्‍वासन देण्यात आले होते.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मुंबई येथील सहयाद्री अतिथीगृहात चर्चा झाली. त्यावेळीदेखील मुख्यमंत्री यांची मिटींगची तारीख घेऊन कळवितो असे सांगण्यात आले होते. जिल्ह्यातील मिनीडोअर चालक मालकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अनेक वेळा अर्ज देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेकडून केला जात आहे. त्यामुळे मिनीडोअर चालक व मालकांनी आता आक्रमक भूमिका घेत आंदोलन तीव्र करण्याच्या तयारीत आहेत. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी पदमश्री बैनाडे यांची भेट घेऊन या प्रश्‍नांबाबत माहिती दिली.

मिनीडोअर रिक्षा चालक, मालकांचे प्रश्‍न 19 डिसेंबरपर्यंत प्रशासन व अथवा सरकारने सोडविले नाहीत तर येत्या 20 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाणार आहे. साखळी उपोषण न्याय मिळेपर्यंत असणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशनातदेखील देखील हे आंदोलन केले जाणार.

विजय पाटील
मिनीडोअर रिक्षा संघटना अध्यक्ष
Exit mobile version