चिरनेर परिसरात अवकाळीमुळे नुकसान

| चिरनेर | वार्ताहर |

चिरनेर परिसरात अवकाळी पावसाने मंगळवारी रात्री हजेरी लावल्याने येथील शेतकरी वर्गाबरोबर आंबा बागायतदार वीटभट्टी उत्पादक धास्तावले आहेत. मंगळवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात पूर्णतः बदल झालेला दिसून येत आहे. गेले चार-पाच दिवस ढगाळ वातावरण या परिसरात दिसून येत होते. अखेर मंगळवारी रात्री हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. अचानक पाऊस आल्यामुळे वीट भट्टी व्यवसायिक व आंबा उत्पादक बागायतदार चिंता व्यक्त करत आहेत.

आंब्याच्या झाडांना आता कुठे मोहोर लागण्यास सुरुवात झाली आहे. मोहोर बाहेर पडून, फुललेल्या मोहरावर पाऊस पडल्याने रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येथील रब्बी हंगामातील वाल, चवळी, मूग, हरभरा आदी कडधान्य पिकांनाही हा पाऊस हानिकारक ठरू शकतो असे येथील कृषीमित्र शेतकरी प्रफुल्ल खारपाटील, गोपीनाथ गोंधळी, अनिल केणी, अरुण केणी,कल्पेश म्हात्रे हरिश्चंद्र गोंधळी यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे मळे या पावसामुळे धोक्यात आले असून, या भाजीपाल्यावरही अवकाळी पावसाचा परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याचे भाजीपाला उत्पादक शेतकरी कृष्णा म्हात्रे यांनी सांगितले. याशिवाय पशुपालक शेतकऱ्यांनी गुरांसाठी राखून ठेवलेला सुकाचारा (पेंढा) भिजून गेला असल्याचे शेतकऱ्यांकडून समजते.

तालुक्यात कोणत्याही प्रकारचे फारसे नुकसान झाल्याची तक्रार आमच्या कृषी विभागाकडे अजून पर्यंत आली नाही.

सुरज घरत, कृषी सहाय्यक अधिकारी
Exit mobile version