लांजा, संगमेश्‍वरला पावसाचा तडाखा

कापणी केलेल्या पिकावर पाणी; शेतकरी चिंताग्रस्त

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

सलग दोन दिवस पडणार्‍या मुसळधार पावसाने लांजा व संगमेश्‍वर तालुक्याला तडाखा बसला आहे. शुक्रवारी-शनिवारीही संगमेश्‍वरात धामणी, गोळवलीत वेगवान वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. लांजा तालुक्यातील भांबेड बाजारपेठेतील दोन घरांचे सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच संगमेश्‍वर खाडी पट्ट्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झालेला आहे. या पावसामुळे दिवसभर कापून ठेवलेले भात भिजून गेल्यामुळे नुकसान झाले आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली होती. मात्र, बुधवारपासून सलग दोन दिवस सायंकाळच्या अचानकपणे वेगवान वार्‍यासह जोरदार पाऊस पडत आहे. संपूर्ण तालुक्यात हा पाऊस कोसळला असला तरीही भांबेड, पेठदेव बाजारपेठेला वादळाचा तडाखा बसला. वेगवान वार्‍यामुळे दोन घरांवरील असलेले सिमेंट पत्रे आणि छपरांची कौले उडून गेली. यामध्ये शैलजा जयराम गांधी यांच्या घराचे 1 लाख 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच विलास परब यांच्या घराचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा भांबेड मंडळ अधिकारी मराठे तसेच कोतवाल विजय दळवी यांनी केला. संगमेश्‍वर तालुक्यातील डिंगणी, प्रिंदवणे, फुणगुस, कोंडये परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे परिसरात सर्वत्र पाणीच पाणी साचलेले होते. कापलेली भातशेती वाहून गेली आहेत. डिंगणीमधील काष्टेवाडी येथील पाईपलाईन तुटले असून, विजेचे खांबही पडलेले आहेत. रस्त्याशेजारील झाडे पडून डिंगणीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. जाधववाडी येथील माधव जाधव यांच्या घराच्या मंडपाचे छप्पर उडाले. डिंगणी आगरवाडी, खाडेवाडी येथे खांब पडले असून विद्युत प्रवाह खंडित झाला आहे.

Exit mobile version