। चणेरा । वार्ताहर ।
रोहा येथे गुरुवारी (दि. 12) रात्री मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. चणेरा विभागातील पांडुरंग महादेव कोळी (रा . गोफण) यांच्या घरावर भले मोठे झाड पडून घराचे नुकसान झाले. तर गावात इतर आठ घरांचेदेखील किरकोळ नुकसान झाले आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन नुकसान झालेल्या घरांचा पंचनामा केला आहे. तसेच, शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गोफण गावातील पांडुरंग कोळी यांच्या घरात अल्केश्वर महतो हे आपल्या कुटुंबियांसह भाड्याने राहत होते. अल्पेश्वर महतो हे कामानिमित्त बाहेर गेले होते. घरामध्ये त्यांची दोन मुलं व पत्नी होती. दरम्यान, रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे एक भले मोठे झाड त्यांच्या घरावर पडले. झाड पडल्याचा आवाज येताच घरातील इतर मंडळी मागच्या दाराने बाहेर पडली. त्यामुळे मोठी जीवितहानी टाळली. मात्र, यात घरावरील दहा फुटी 12 पत्रे, 20 फुटी चार पाईप व इतर किरकोळ नुकसान झाले आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन नुकसान झालेल्या घरांचा पंचनामा केला.