परतीच्या पावसामुळे भातपिकांचे नुकसान; पंचनामे करण्याची मागणी
| कोलाड | प्रतिनिधी |
सतत पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे रोहा तालुक्यातील कोलाड खांब परिसरातील उभी असणारी भातपिके आडवी झाली आहेत. यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता निर्माण झाली असून यामुळे बळीराजा पूर्णपणे संकटात सापडला आहे. अशी परिस्थिती पाहून बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.
दसरा झाल्यानंतर भात कापणीला सुरुवात केली जाते. परंतु, चार महिने पडणारा पाऊस हा यावर्षी सहावा महिना उजाडला तरी थांबण्याचे नाव घेत नाही. यामुळे कापणीला आलेली भात पिके जमीनदोस्त झाली आहेत. एकेकाळी असणारा कुलाबा जिल्हा आताचा असणारा रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यात सततच्या पावसामुळे हातातोंडांशी आलेल्या धानाची नुकसान होत असल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.
रोहा तालुक्यातील पुगांव, मुठवली, शिरवली, खांब, तसेच इतर काही भागात मागील उन्हाळी लागवडीतील शेती मे महिन्यात पडलेल्या पावसाने भातशेतीत पाणी साचून भातशेतीचे मोठे नुकसान झाले. काही भात पिक उभे असणारे कुजून गेले, तर काही शेतकऱ्यांनी कापणी केलेली पिके जमिनीवर लोळत वाहून त्या धानाची नासाडी झाली. त्याचे तत्काल पंचनामेदेखील वरीष्ठ पातळीवरून करण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे केल्याचा प्रशासनानी दिलासा दिला. मात्र, त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही.
आधुनिक काळात रासायनिक खते, नांगरणी, भात लागवडीचा खर्च वाढला असूनही याला न जुमनता शेतकरी वर्ग भातशेती करत असतो. परंतु, निसर्गाच्या कोपामुळे उभी असणारी भातपिके आडवे झाली आहेत. यामुळे भात शेतीत पाणी साचून राहत असल्याने भाताला आलेले धान कुजायला लागले आहे. यामुळे प्रशासनाने ओला दुष्काळ जाहीर करून पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.
– महादेव जाधव, शेतकरी, गोवे







