सततच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान

नेरळ परिसरात रोपे कुजली
| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात भाताची रोपे तर काही भागात लावणी पूर्ण झालेली भाताची लागवड यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या कडेला असलेल्या भागातील शेतीमध्ये सलग पाच सहा दिवस पाणी साठून राहिले आणि त्यामुळे भाताच्या शेतीचे नुकसान झाले असून रोपे कुजली असल्याने बळीराजाच्या संकटात भर पडली आहे.

मुसळधार कर्जत तालुक्यातील भातशेती पाण्याखाली जाऊन शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताची रोपे पाण्याखाली गेल्याने दुबार भात पेरणी देखील शक्य नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. तालुक्यातील अनेक गावांतील शेतजमिनीत पावसाचे पाणी शिरल्याने लावणीसाठी तयार झालेले भाताची रोपे (राब) पाण्याखाली झिरपून वाहून गेली आहेत. यामुळे शेतीची झिज होऊन बर्‍याच शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळले असून, या संकटाची साधी पुष्टीसुद्धा करण्यास अद्याप शासनाचा एकही माणूस शेतकर्‍याच्या बांधावर गेला नाही, तर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास कधी येतील? असा प्रश्‍न पडला असताना वेणगाव, वदप, कुशिवली, गौरकांत, जंभिवली, जांबरुख, बारणे, सलोख, तांबस, सावेळे भोईरवाडी, मार्केवाडी, कुंडलज, पोसरी, तिवरे, तमनात, खांडपे, मुळगाव, कोंडीवडे, सापेले, वावे, बेंडसे, चांदई, वडवली, कडाव, पोटल पाली, वैजनाथ, मंडवणे कराले वाडी, भाडीवली, सावरगाव,एकसल, मावगाव, बेकरे, देऊळ वाडी, मालवाडी, कोषाने, पिंगळस, खांडस, नांदगाव, बळीवरे, बोरिवली, सुगवे, नालदे या भागातील भाताच्या शेतीत सतत पाच अशा दिवस पाणी साचून राहिल्याने भाताचे क्षेत्र संकटात आले आहे.

कळंब,भडवल,आणि डोंगर भाताची लावणी देखील पूर्ण सुरु झाला आणि त्यात भाताची लागवड केलेली रोपे देखील कुजून गेली आहेत.तर त्या ठिकाणी आता नव्याने भाताची रोपे आणून लावण्याची सुविधा नाही. कारण नव्याने भाताचे रोपे कोणाकडे उपलब्ध नाहीत आणि उपलब्ध असतील त्यांना ती त्यांच्या शेतात लागवड करण्यासाठी लागणार आहेत. त्यामुळे आमचे नुकसान आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे असे पोही येथील शेतकरी दिनेश भोईर यांनी सांगितले आहे.

खूप पाऊस पडत असल्याने शेतकर्‍यांच्या शेतात पाणी जाऊन काही ठिकाणची शेती पाण्याखाली गेली आहे.परिसथिती नियंत्रणात आल्यानंतर भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले जातील आणि वरिष्ठ कार्यलयाकडे पाठवले जातील.

– शीतल शेवाळे- तालुका कृषी अधिकारी


Exit mobile version