बाजारात भाज्यांना मागणी वाढली
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
नवरात्रोत्सवात घरोघरी होणार्या उद्यापने आणि व्रतवैकल्यामुळे शाकाहाराला अधिक पसंती आहे. पालेभाज्यांना मागणी वाढल्यामुळे दर वधारले आहेत. बहुतांश भाज्यांनी शंभरी ओलांडली असून, टोमॅटो व कांद्याची साठी तर बटाट्यानींही पन्नाशी पार केली आहे.दरवाढीमुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. जिल्ह्यात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाल्या नंतर या दिवसात सात्विक शाकाहार घेतला जातो. यामुळे या दिवसात भाज्यांना मागणी वाढते; मात्र, पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने जिल्ह्यात भाजीपाला आवक मंदावली आहे.
त्यातच सणवार असल्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे दरवाढ झाली असल्याचे सांगण्यात येते. टोमॅटो, हिरवी मिरची, कोबी, वांगी, फ्लॉवर, पावटा, गाजर, घेवडा, फरस बी, गवार, सिमला मिरचीसह मुळा, माठ, पालक, शेपू, मेथी या पालेभाज्यांचीही वाढ झाली आहे. बाजारात नवीन बटाट्याची आवक होत असून, 40-50 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. लसणाचे दर अद्याप तेजीतच आहेत. लसूणबरोबरच कांद्यानेही दरात पुन्हा उसळी घेतली असून, 250 ते 400 रुपये किलो दराने लसणाची विक्री सुरू आहे. कांदा 60 रुपयेदराने विकला जात आहे. काही भागात ओला कांदा 35 ते 40 रुपये दराने विकला जात आहे. पावसाचे दिवस असल्यामुळे गृहिणींचा सुका साठवणुकीचा कांदा घेण्याकडे कल आहे; मात्र काद्यांचे दर वाढले असल्याने तूर्तास किरकोळ खरेदी करून समाधान मानावे लागत आहे.