श्रीवर्धनमधील नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

नुकसान भरपाई जाहीर; खिसा मात्र रिकामाच

। दिघी । वार्ताहर ।

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात एक महिन्यापुर्वी वादळी संकट येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळेल, असे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यांना अद्यापही भरपाई मिळाली नसल्यामुळे नुकसानग्रस्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

श्रीवर्धमध्ये 9 ऑगस्ट रोजी चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले. काहींचे कौलारू छप्पर कोसळले तर काहींना व्यवसायिक साहित्य पाण्यामुळे खराब झाल्याने मोठया प्रमाणात आर्थिक नुकसानीचा फटका बसला. त्यामुळे अनेक या वादळातील नुकसानग्रस्त अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

सोमवारपासून सुरु झालेल्या अतिवृष्टीमुळे येथील नुकसानग्रस्त कुटुंबावर वादळी संकट आले आहे. या कुटुंबाला अद्याप कोणतीच मदत मिळाली नसल्याने सध्या त्यांनी अवस्था बिकट आहे. त्यामुळे शासनाने दिलेली मदत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधीचे प्रयत्न अपुरे ठरत आहे, हीच बाब अधोरेखित झाली आहे.

कोण देणार माहिती –
नैसर्गिक आपत्ती विभागाकडून मिळालेल्या माहितीनूसार, यंदा तालुक्यातील अंदाजे 18 घरे आणि 8 गोठ्यांचे नुकसान झाल्याचे समजते. यातील किती नुकसानग्रस्तांना मदत मिळाली, याची विचारणा केली असता अधिकार्‍यांकडे माहिती नसल्याचे उत्तर मिळत आहे.

कधी मिळणार भरपाई
वादळातील ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी तात्काळ पंचनामे करण्यात आले. परंतु अद्यापही काही नुकसानग्रस्तांना भरपाई प्राप्त झाली नाही. तलाठी, तहसील कार्यालय आणि बँकातून सर्वसामान्यांचे हेलपाटे सुरूच आहेत. आता मदत कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे तुटलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून जनावराला जीव गमवावा लागला. तातडीने पंचनामासुध्दा करण्यात आला. निष्क्रिय प्रशासनाच्या कारभारामुळे आज वर्षभर फेर्‍या मारत आहे. नक्की नुकसान भरपाई माहिती कोणाकडे मिळेल, याचा ठावठिकाणा लागत नाही.

महेश जाधव, कुडगाव.
Exit mobile version