माणगावात नाचणी फळप्रक्रिया प्रशिक्षण

। माणगाव । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासन कृषी विभाग माणगाव यांचे मार्फत तालुका कृषि अधिकारी माणगाव आर.डी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य आधारित शेतकरी प्रशिक्षण अंतर्गत नाचणी व फळ प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन मौजे कोस्ते खु. येथे करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी डॉ. सुधाकर पाध्ये, विषय विशेषज्ञ अन्नप्रक्रिया विभाग कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा, यांनी निजामपूर विभागातील उपस्थित बचत गटांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नाचणीपासून प्रक्रिया करून तयार करण्यात येणारे लाडू, पापड, बिस्किटे, केक, तसेच फळांवर प्रक्रिया करून लोणचे, रस इत्यादी बद्दल सखोल मार्गदर्शन केले, या प्रशिक्षणादरम्यान उपस्थित गटातील सदस्यांना डॉ. पाध्ये यांनी नाचणीपासून लाडू तयार करण्याची प्रात्यक्षिक प्रत्यक्ष करून दाखविले. या कार्यक्रमासाठी निजामपूर विभागातील जवळ जवळ 10 बचत गटातील 95 महिला सदस्यांनी भाग घेतला. या प्रशिक्षणावेळी आर. ए. शिंदे कृषी पर्यवेक्षक, निजामपूर यांनी उपस्थित शेतकरी गटांना नाचणी पिकाचे महत्व, बाजारातील वाढती मागणी, तसेच विक्री व्यवस्थेबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमोद शिंदे तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा यांनी उपस्थित प्रक्रिया करणार्‍या शेतकरी गटांना कृषी विभागाचे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेबद्दल माहिती दिली.

Exit mobile version