चोळई नदीच्या पुराचा धोका महामार्गाला

तातडीने उड्डाणपूल बांधण्याची गरज
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
शहराच्या जमिनीखालून अंडरपास जाणार्‍या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गामध्ये तांबडभुवनपासून काही अंतरावर असलेल्या सडवली फाटयाजवळील चोळई नदीच्या पुराचे पाणी शिरल्यास संपूर्ण अंडरपास पाण्याने तुंबून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प होण्याचे संकेत गेल्या वर्षीपासून मिळत असताना यंदाच्या एकूणच अंडरपासमधील नियोजनशून्य महामार्ग बांधकामाचे स्वरूप पाहता अंडरपास तातडीने बुजवून उड्डाणपूल बांधण्याची गरज निर्माण होणार आहे.

पोलादपूर एस.टी.स्थानकासमोरील भूसंपादन 60 मीटर्स अपेक्षित असताना केवळ 45 मीटर्स करण्यात आले आहे. यात दोन्ही बाजूंच्या सेवा रस्ते म्हणजे सर्व्हिस रोडसाठी 7.5 मीटर्स रूंदी अपेक्षित असून अंडरपास बॉक्स कटींगवर व्हेईक्युलर ओव्हर ब्रिज मंजूर आराखडयात केवळ एक असताना पोलादपूर एस.टी.स्थानक परिसरामध्ये तसेच संध्यारात्री तीर्थक्षेत्रापर्यंत जाण्याची सोय होण्यासाठी तब्बल चार व्हेईक्युलर ओव्हर ब्रिजचे काम सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गाने याठिकाणी 45 मीटर रूंदीचे भूसंपादन होणार असताना याचठिकाणी सुमारे 30 ते 35 फूट खोल अंडरपास बॉक्स कटींग करून तेवढयाच अंतरात अंडरपासमध्ये चारपदरी महामार्ग आणि वरल बाजूला एकाबाजूने गटारसदृश्य फूटपाथ असलेले पूर्वेकडील आणि पश्‍चिमेकडील असे दोन सर्व्हिसरोड केले जात आहेत.

त्यामुळे सर्व्हिसरोडची रूंदी अपेक्षेपेक्षा कमी होत असून अंडरपासमधून जाणार्‍या चारपदरी महामार्गाच्या दुतर्फा, वरील बाजूस असलेल्या सर्व्हिसरोडवरून कोसळणार्‍या पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही तरतूद नसल्याने अंडरपासमधील महामार्गावर पडणारे पावसाचे पाणी बॉक्सकटींगमध्ये जिरून आता त्याठिकाणी असलेले स्टीलच्या जाळीवरील सिमेंट काँक्रीट फोमचे फवारे लालमातीच्या ढिगार्‍यांसोबत कोसळू लागले आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला ही वस्तुस्थिती दूर्लक्षित करावीशी वाटली तरी तांबडभुवनपासून शे-दोनशे मीटर्स अंतरावर सडवली फाटयावरील चोळई नदीचे पात्र दुथडी भरून वाहू लागले की त्या पाण्याचा प्रवाह थेट अंडरपासमधील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला मानवनिर्मित नवीन नदीचा प्रवाह म्हणून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्यास कारणीभूत ठरणार आहे.

Exit mobile version