देवळी जुईअब्बास येथे दरड कोसळण्याचा धोका

पेण । वार्ताहार ।
पेण तालुक्यातील देवळी जुईअब्बास येथे दरड कोसळून अथवा भूस्खलन होऊन जीवितहानी होण्याचा धोका असल्याने त्यावेळी देवळी व जुईअब्बास ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला कळवले होते. परंतु प्रशासनाने या बाबीकडे लक्ष काही दिले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी महाड तळीये गाव आणि पोलादपूर सुतारवाडी या गावांमध्ये जुलै महिन्यात दरड कोसळून 47 जणांचा मृत्यु झाला. आणि दरड कोसळण्याचा प्रश्‍न एैरणीवर आला.

जिल्हयातील 72 ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका होणार आहे, असे वृत्त प्रसिध्द झाले आहे. परंतु पेण तालुक्यातील देवळी जुईअब्बास तसेच पेण शहरातील फणस डोंगरी, पिर डोंगरी या परिसराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणतीच माहिती पुढे येत नाही. याचा अर्थ असा की, स्थानिक प्रशासन संभाव्य धोक्याची कल्पना जिल्हाधिकारी कार्यालयाला देत नाही, असे म्हणावे लागेल. दोन वर्षापूर्वी पाबळ खोर्‍यातील बरडावाडी परिसरात डोंगराला भेगा गेल्याची बाब समाजसेवक अरुण शिवकर यांनी प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिली होती. मात्र त्यावर पंचनामा व्यतिरिक्त कोणतीच उपाययोजना झाली नाही.

26 जुलै 2021 रोजी खारपाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा सदस्य किरण तुरे यांनी संभाव्य धोक्याबाबत लेखी तक्रार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्याकडे देखील दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे. येत्या आठवडयात मान्सूनला सुरूवात होईल. त्या अगोदरच पेण तालुक्यातील देवळी जुईअब्बास पेण शहरातील फसण डोंगरी, पिर डोंगरी या परिसराचे योग्य ते पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे पाठवावा. व तेथे राहणार्‍या रहिवास्यांना योग्य त्या खबरदारीच्या सुचना दयाव्यात अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Exit mobile version