नेरळ पूर्वला महापुराचा धोका; बांधकाम व्यावसायिकाकडून अतिक्रमण

। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ पूर्व भागात अनेक त्रुटींमुळे मागील काही वर्षे पावसाळ्यात महापुराची पाणी घरात घुसून मोठे नुकसान होत असते. यावर्षी तेथून वाहणार्‍या अरुंद नाल्यांवर बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून पूल बांधले जात आहेत. त्यामुळे यावर्षी नेरळ पूर्व भागातील निर्माण नगरी, गंगानगर आणि मातोश्रीनागर भागात यावर्षीदेखील पाणी तुंबून राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्याच्या कडेने वाहणार्‍या नाल्यावर अनधिकृतपणे पूल बांधणायचे काम तात्काळ थांबवावे, अशी मागणी स्थानिकांनी रायगड जिल्हा परिषदेकडे निवेदन देऊन केली आहे.

नेरळ हद्दीमध्ये नेरळ कळंब राज्य मार्ग क्र. 109 रस्त्याला लागून मातोश्रीनगर भागामध्ये रस्त्यालगतच्या जमीन मालकांनी स्लॅब ड्रेनचे काम सुरु केले आहे. सदरचा रस्ता हा आपल्या अखत्यारीत येत आहे. सदर स्लॅब ड्रेनचे पूल बांधण्याच्या कामास स्थानिक भागातील रहिवाशांनी हरकत घेतली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सदरचा नाला हा अरुंद असून, तो रुंदीकरण करणे आवश्यक आहे, अशी स्थानिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. याच नाल्यामधून पावसाळमध्ये नाल्यामधून पाणी वाहून जात असते. मात्र, अतिवृष्टी झाली की नाल्यातील पाणी आजूबाजूच्या घरांमध्ये घुसते आणि त्यामुळे महापुराचा फटका सर्वांना बसत असतो. नाल्यावर यापूर्वीदेखील खासगी जमीनधारकांनी मोठ्या प्रमाणात स्लॅब ड्रेनची कामे झाली आहेत, ती सर्व कामे नष्ट करून स्थानिकांना दिलासा देण्याची गरज आहे.

याबाबत गंगानगर, मातोश्रीनागर आणि निर्माणनगरी भागातील स्थानिकांनी रायगड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता, नेरळ ग्रामपंचायत यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. या नाल्यावर सुरु असलेले अतिक्रमणे तात्काळ थांबवावे आणि नाल्यावरील पूल तोडून टाकण्यात, अशी मागणी स्थानिकांनी केली असल्याची माहिती श्रीराम राणे यांनी दिली आहे.

मागील काही वर्षे पाणी घरात घुसत असल्याने स्थानिकांनी या नाल्यावरील सर्व साकव पूल तोडून टाकण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी त्या नाल्याचे खोलीकरण करून नाल्याच्या कडेला झालेली अनधिकृत बांधकामे तोडून टाकण्याची मागणी केली आहे.

श्रीराम राणे, प्रभारी तालुका चिटणीस, शेकाप
Exit mobile version