दिघी-वेळास मार्गावर दरडींचा धोका?

महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाची अद्यापही पूर्वतयारी नाही
। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्याला जोडण्यात आलेल्या दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळजवळ पूर्ण होत आहे. मात्र, याच मार्गावरील दिघी-वेळासदरम्यानच्या घाटातील रस्त्यालगत असणारे डोंगर पावसाळी धोक्याचा इशारा देत आहेत. त्यामुळे या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी पुढे येत आहे.
तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूर, दरडी कोसळणे यासारख्या आपत्ती, जास्त करुन घाट रस्त्याला होत असल्याने अनेक अपघाती घटना दरवर्षी समोर येत आहेत. मागील वर्षात जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे दिघी-वेळास घाटात ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. प्रसंगी वाहतुकीचा खोळंबा झाल्याने या मार्गावरील वाहने इतर रस्त्यांनी फिरवण्यात आली. कारण, रस्त्याच्या कामासाठी येथील डोंगर पोखरण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षीसुद्धा दरडीपासून धोका उद्भवू शकतो, अशी शक्यता प्रवाशांकडून वर्तवली जात आहे.
दिघी-वेळास मार्गावर दिघी पोर्टकडे जाणार्‍या लहान-मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. त्यात पर्यटन म्हणून मुरुड व श्रीवर्धन तालुका याच मार्गाने जोडल्याने रस्त्याला बारमाही पर्यटकांच्या वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मात्र, या मार्गातील कुडगाव गावाच्या पुढे घाट रस्त्याला पाण्याची टाकीसमोरील डोंगरावरील लहानसहान दगड रस्त्यावर येत असल्याची माहिती प्रवाशांकडून मिळत आहे. त्यामुळे यंदा या मार्गाला पावसाळी दरडीचा संभाव्य धोका पाहता महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाने याकडे कोणतीच पूर्वतयारी वा खबरदारी घेत नसल्याचे समोर येत आहे. याकडे संबंधित खात्यांनी आपापली जबाबदारी ओळखून तिथे कोणताही अपघात होणार नाही, या गोष्टीची काळजी घ्यावी व या गंभीर बाबीकडे लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक प्रवासी करत आहेत.

दिघी-वेळास घाटात संभाव्य दरड कोसळण्याचा धोका पाहता संबंधित विभागाने योग्य ती काळजी घेऊन पावसाळी होणार्‍या दुर्घटना टाळाव्यात. जोरदार पावसात डोंगरातील दगडी रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे सध्या येथील वाहन चालकांचा प्रवास भीतीदायक बनला आहे.

नरेश जाधव, वाहन चालक

भूखंड प्रक्रिया अपूर्ण
महामार्ग पूर्ण होत असला तरीही रस्त्याच्या बाजूला खोल दरी ठिकाणी किंवा रस्त्यालगत असणार्‍या उंच डोंगरावरील दरडींमुळे होणार्‍या दुर्घटना रोखण्यासाठी वनविभाग व महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ यांच्यातील भूखंड प्रक्रिया अपूर्ण असल्याचे कारण समोर येत आहे. त्यामुळे येथील रस्ते अद्याप प्रवासाकरिता धोकादायक ठरत आहेत.

Exit mobile version