| महाड | प्रतिनिधी |
महाड ते किल्ले रायगड मार्गावर दोनही बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये झाडे आणि झुडुपे वाढली असल्याने समोरुन येणारी वाहने दिसत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये खड्डे पडले असल्याने दुचाकीस्वारांचे अपघात सातत्याने घडत आहेत. रस्त्यालगत असलेली झाडे आणि खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी किल्ले रायगड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगड ते महाड या मार्गावरील वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. किल्ले रायगड हे प्रसिध्द ऐतिहासिक स्थळ असल्याने पर्यटक आणि शिवभक्त कायम या मार्गाने गडाकडे जात असतात. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जात असताना वाहन चालकांची गैरसोय होत आहे. रस्त्याची पूर्ण दुरवस्था झालेली असताना संबंधित ठेकेदार, राष्ट्रीय महामार्ग विभागा कडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रायगड परिसरांतील सामाजिक कार्यकर्ते कमलेश कोरपे, लहू अवकीरकर यांनी केला आहे.किल्ले रायगड मार्गावरील अडचणीच्या मार्गाची पाहणी करण्यात येऊन गैरसोय दूर केली जाईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपकार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम यांनी सांगितले.